मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवला जुना अर्थसंकल्प; विधानसभेत भाजपचा गदारोळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी विधानसभेत चुकून चक्क मागील वर्षाचा अर्थसंकल्प वाचून दाखवला. विरोधी बाकावरील भाजप आमदारांच्या लक्षात ही गोष्ट येताच सभागृहात मोठा गदारोळ पहायला मिळाला. यानंतर विधानसभा कामकाज 30 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं

गेहलोत यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पाऐवजी शहरी रोजगार आणि कृषी बजेटवरील मागील अर्थसंकल्पातील उतारे वाचून दाखवले. 2022-23 च्या अर्थसंकल्पातील पहिल्या दोन घोषणा त्यांनी करताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि सभागृहाच्या वेलमध्ये धाव घेतली.

केंद्रीय मंत्री आणि जोधपूरचे खासदार गजेंद्रसिंह शेखावत यांनी गेहलोत यांचा व्हिडिओ ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पेपर लीकनंतर आता राजस्थानचे बजेटही लीक! गेहलोतजींनी बजेटची एक कॉपी स्वतःजवळ ठेवली असती तर त्यांना जुनी प्रत वाचावी लागली नसती असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, भाजपच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सुद्धा गेहलोत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं. मुख्यमंत्री आठ मिनिटे जुना अर्थसंकल्प वाचत राहिले. ही पहिली ऐतिहासिक घटना आहे. मी सुद्धा मुख्यमंत्री झाले आहे. परंतु मी बजेट हातात घेऊन 2-3 वेळा वाचायचे आणि सगळं तपासून बघायची असं म्हणत जो मुख्यमंत्री जुना अर्थसंकल्प वाचतो, त्यांच्या हातात राज्य किती सुरक्षित आहे, हे समजू शकते, अशा शब्दात वसुंधरा राजे यांनी गेहलोत यांच्यावर निशाणा साधला.