Rajdhani Express Accident : देशातून एक मोठी रेल्वे अपघाताची बातमी समोर येत आहे. सैरांगवरुन नवी दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने हत्तीच्या कळपाला धडक दिली. या भीषण धडकेत ८ हत्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुसरीकडे, रेल्वेचे ५ डब्बे सुद्धा रुळावरून घसरले. या अपघातात कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. शुक्रवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला
रेल्वेने बचाव कार्य सुरू केले – Rajdhani Express Accident
याबाबत रेल्वे प्रवक्त्याने सांगितले की नवी दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनचा अपघात पहाटे २:१७ वाजता झाला. नागाव विभागीय वन अधिकारी सुहास कदम यांनी सांगितले की ही घटना होजई जिल्ह्यातील चांगजुराई भागात घडली. कदम आणि इतर वन अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. अपघातामुळे अप्पर आसाम आणि ईशान्येकडील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वेने बचाव कार्य सुरू केले आहे आणि प्रवाशांचा पुढील प्रवास सुनिश्चित करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करत आहेत. या दुर्घटनेत जे डब्बे रुळावरुन घसरले. त्यातील प्रवाशांना अन्य डब्ब्यातील रिकाम्या बर्थवर शिफ्ट करण्यात आलं आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. गुवाहाटी पोहोचल्यानंतर, सर्व प्रवाशांना सामावून घेण्यासाठी ट्रेनमध्ये अतिरिक्त डबे जोडले जातील आणि त्यानंतर ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना होईल. Rajdhani Express Accident
हत्तीच्या शरीराचे तुकडे-
ट्रेनची धडक इतकी जोरदार होती की, हत्तीच्या शरीराचे तुकडे-तुकडे झाले. हत्तींच्या शरीराचे अवयव रुळांवर विखुरलेले असल्याने आणि रुळावरून घसरलेल्या डब्यांमुळे रेल्वे सेवा विस्कळीत होत आहे. लोको पायलटने आपत्कालीन ब्रेक लावले आणि ट्रेन थांबवली त्यामुळे आणखी मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर या मार्गावरील अनेक ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. काही ट्रेन्सचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्याशिवाय रेल्वे प्रशासनाकडून प्रवासी आणि त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यासाठी हेल्पलाइन नंबर सुरु करण्यात आला आहे.




