हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) आज जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यातील हरियाणामध्ये एक टप्प्यात निवडणूक होणार असून 1 ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येईल. तर जम्मू काश्मिरमध्ये तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. या दोन्ही निवडणुकांचा निकाल 4 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत माहिती दिली. मात्र यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला नाही. परंतु या तारखा जाहीर न करण्याचे कारण त्यांनी सांगितलं आहे. जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा आवश्यकतांमुळे महाराष्ट्रातील निवडणुका नंतर जाहीर केल्या जातील, असं राजीव कुमार यांनी म्हटलंय.
आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी म्हंटल कि, गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याठिकाणी सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या काळात सर्व उमेदवारांना कडेकोट सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. याच कारणाने या काळात महाराष्ट्रात निवडणुका घेतल्या जाणार नाहीत. जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा आवश्यकतांमुळे महाराष्ट्रातील निवडणुका नंतर जाहीर केल्या जातील असं स्पष्टीकरण राजीव कुमार यांनी दिले. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लांबणीवर पडणार हे आता समोर आलं आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत ही 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे आता दिवाळीनंतरच राज्यात निवडणुका लागण्याची शक्यता आहे. निवडणुका जाहीर झालेल्या नसल्या तरीही राज्यातील पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे.
Maharashtra elections will be announced later due to security requirements for Jammu and Kashmir: CEC Rajiv Kumar
— Press Trust of India (@PTI_News) August 16, 2024
दरम्यान, जम्मू आणि काश्मीर हा विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश आहे. पूर्ण राज्याचा दर्जा रद्द केल्यानंतर तेथील विधानसभेचे चित्रही बदलले आहे. आता जम्मू-काश्मीरमध्ये 114 जागा आहेत, त्यापैकी 24 जागा पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) येतात. अशा प्रकारे केवळ 90 जागांवर निवडणूक होणार आहे. 90 पैकी 43 जागा काश्मीर विभागात, तर 47 जागा जम्मू विभागात गेल्या आहेत. एकुंज 90 विधानसभा मतदारसंघापैकी 74 सर्वसाधारण, SC-7 आणि ST-9 आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 87.09 लाख मतदार असतील. ज्यामध्ये 44.46 लाख पुरुष, 42.62 लाख महिला, 3.71 लाख प्रथमच मतदार आणि 20.7 लाख तरुण मतदार आहेत.