जागावाटपावरून शिंदे गट- भाजपमध्ये वादाची ठिणगी; कोकणात राजकारण तापलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना जागावाटपावरून भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे. निमित्त ठरलं आहे ते म्हणजे रत्नागिरी सिधुदुर्ग मतदारसंघाची जागा… या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट आणि भाजप दोन्हीकडून दावा कऱण्यात आला आहे. शिंदे गटाचे उदय सामंत यांनी हि जागा शिवसेनेला मिळावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर भाजप नेते नारायण राणे यांनी ही जाग भाजपच लढवणार आहे असं म्हणत सामंतांना आव्हान दिले. आता या वादात शिंदे गटाच्या रामदास कदमांनी उडी मारली असून थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे. सोबत आलेल्या पक्षाला संपवून भाजपला एकट्याला जिवंत राहायचं आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास कदम म्हणाले, तुम्ही रायगडवर पण दावा सांगाल आणि रत्नागिरीमध्ये पण आम्हीच असं म्हणाल…. परंतु आम्हीच असं होत नाही. सोबत आलेल्या पक्षाला संपवून भाजपला एकट्याला जिवंत राहायचं आहे का? ‘आम्ही दोघे भाऊ भाऊ, तुझा आहे ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नका लावू’ अशी भाजपची भूमिका आहे. यापूर्वी रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा शिवसेनेने लढली आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही रत्नागिरीची जागा सोडणार नाही. ती जागा शिवसेनेने लढवावी, अशी माझी इच्छा आहे. पण निर्णय मुख्यमंत्री घेतील असं रामदास कदम यांनी म्हटले आहे.

यापूर्वी राणे- उदय सामंत यांच्यात खडाजंगी –

राज्याचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाची तयारी केली असून ते निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे हि जागा आपल्याला मिळावी अशी इच्छा उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. मात्र दुसरीकडे याच मतदारसंघातून भाजप नारायण राणे याना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे सामंत यांनी या मतदारसंघावर दावा करताच राणेंनी लगेच ट्विट करत रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही भाजपच लढवेल असं म्हंटल होते. त्यामुळे कोकणातील हा महत्वाच्या मतदार संघावरून युतीमध्येच वाद पाहायला मिळत आहे असं चित्र आहे.