केसाने गळा कापण्याचे काम करू नका; शिंदे गटाचा भाजपला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र्रातील भाजप. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीत जागावाटपाच्या मुद्द्यावरून वादाची ठिणगी उडाली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी भाजप 32 ते 37 जागा लढवण्याची शक्यता असून शिंदे गटाची अवघ्या 8 ते 10 जागांवर बोळवण करण्यात येऊ शकते. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. विश्वासघात करत केसाने गळा कापण्याचे काम करू नका असं म्हणत रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदास कदम म्हणाले, माझी प्रामाणिक इच्छा आहे की, मोदी, शाहांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, कान पकडले पाहिजेत. प्रत्येकालाआपला पक्ष वाढवायचाच आहे. पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत, त्याच लोकांचा केसाने गळा कापून नका . यामुळे भविष्यासाठी भाजपकडून वेगळा मेसेज जात आहे, याचा भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे.’ मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं माहित नाही, पण पुन्हा-पुन्हा आमचा विश्वासाघात झाला तर, माझं नाव पण रामदार कदम आहे, हे मी आज सांगतोय, असं म्हणत रामदास कदम यांनी भाजपला थेट शिंगावर घेतलं आहे.

शिंदे गटाला 8 जागा??

दरम्यान, काल देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात जागावाटपाबाबत खलबतं झाली. यावेळी युतीकडून 2 फॉर्म्युले तयार करण्यात आल्याचे बोललं जात आहे. पहिला फॉर्म्युला म्हणजे भाजप 37 जागा लढणार तर शिंदे गटाला 8 जागा आणि अजित पवार गटाला 3 जागा मिळू शकतात…. तर दुसरा फॉर्म्युला म्हणजे भाजप 36 जागा लढणार, शिंदेंच्या शिवसेनेला 8 जागा आणि अजित पवार गटाला 4 जागा मिळणार … भाजपचा एकहाती वरचष्मा या जागावाटपात पाहायला मिळत आहेत. शिंदे गटाकडे सध्या 13 खासदार आहेत. परंतु जर त्यांना 8 जागा देण्यात आल्या तर बाकीच्या खासदारानी काय करायचं असा प्रश्न निर्माण झालाय.