भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या सुनेचे गंभीर आरोप; मला वेगळ्या खोलीत ठेऊन…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये वर्धा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्या सुनेने तडस कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आज तडस यांच्या सुनेने म्हणजेच पूजा तडस (Pooja Tadas) यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेमध्ये “तडस कुटुंबाने माझ्या बाळाची डीएनए टेस्ट करण्याची मागणी केली होती” असा खुलासा पूजा तडस यांनी केला. तसेच, त्यांच्या कुटुंबावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पूजा तडस आणि सुषमा अंधारे यांनी केली आहे.

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पूजा तडस यांनी सांगितले की, “तडस कुटुंबियांनी मला लोखंडी रॉडने मारहाण केली. बाळाचा बाप कोण आहे? असे प्रश्न विचारुन माझी बदनामी केली. आता मला बाळाची डीएनए टेस्ट करायला सांगितली आहे. खासदारांनी त्यांच्या मुलाला बेदखल केलं म्हणतात पण प्रत्यक्षात मुलाला घरात ठेवलं आहे आणि मला बाहेर काढलं आहे.” असे गंभीर आरोप पूजा तडस यांनी रामदास तडस यांच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर केले आहेत.

इतकेच नव्हे तर, ”सध्या माझ्याकडे दोन वेळच्या जेवणाची सोय नाही की बाळाला दूध पाजण्यासाठी पैसे नाहीत. जर लोकप्रतिनिधी सुनेला न्याय देऊ शकत नाही नसतील तर समाजाला काय न्याय देतील?” असा सवाल ही पूजा तडस यांनी उपस्थित केला आहे. याच पत्रकार परिषदेतून पूजा तडस यांनी वर्धा दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. तसेच, या प्रकरणामध्ये मला न्याय मिळवून द्यावा, असे देखील पूजा तडस यांनी म्हणले आहे.

दरम्यान, पूजा तडस यांनी केलेल्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. या पत्रकार परिषदेमध्ये फक्त पूजा तडस यांनीच नाहीतर सुषमा अंधारेंनी देखील भाजप आणि तडस कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. त्याचबरोबर, “एकीकडे नरेंद्र मोदी देशाला आपले कुटुंब मानतात आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या खासदाराच्या सुनेवर अत्याचार होतो, हे अतिशय गंभीर आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी पुजाला न्याय मिळवून द्यावा” असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.