व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

रामराजेंची मोठी घोषणा!! ‘या’ मतदारसंघातुन लोकसभा लढवणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पक्षाने आदेश दिला तर मी माढा मतदारसंघातून लोकसभा लढण्यास तयार आहे अशी घोषणा रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे. याबाबत अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच घेतील. परंतु इथून पुढचा माढ्याचा खासदार हा वाड्यातीलच होणार , वाड्याबाहेरचा होणार नाही असं म्हणत रामराजेंनी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना ललकारले आहे. ते फलटण येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काही दिवसांपूर्वी रामराजे नाईक‌ निंबाळकर यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त फलटण येथील आयोजित कार्यक्रमात जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांनीही रामराजेंच्या लोकसभा उमेदवारी बाबत सूचक विधान केलं होते रामराजेंना आपल्याला दिल्लीला पाठवायला हवं हाच संदेश घेऊन मी मुंबईला जाणार आहे असं जयंत पाटील यांनी म्हंटल होते. त्यानंतर रामराजेंच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरु झाल्या. पण, रामराजे याला मान्यता देणार का, तसेच शरद पवारांचा ग्रीन सिग्नल मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं होतं. अखेर पक्षाने आदेश दिल्यास आपण माढ्यातून लढण्यास तयार आहे असं रामराजेंनी म्हंटल.

रामराजे म्हणाले, मला जर पक्षाने आदेश दिला तर मी माढा लोकसभेसाठी लढण्यास तयार आहे. त्यासाठी खासदार शरद पवारांचा निर्णय अंतिम असेल. परंतु , माढाचा खासदार यावेळेस फलटणच्या वाड्यातीलच होणार आहे. वाड्याबाहेरचा खासदार होणार नाही, असं म्हणत त्यांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे 2024 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघात रामराजे विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर अशी तगडी लढत पाहायला मिळू शकते.