राज्यातील बीड जिल्हा सध्या राजकीय आणि गुन्हेगारी घडामोडींमुळे चर्चेचा केंद्रबिंदू ठरतो आहे. अशातच निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले यांनी केलेल्या एका धक्कादायक वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. कासले यांनी सोशल मीडियावरून दावा केला आहे की, राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड याचा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न केला होता.
५० कोटींपर्यंतची ऑफर
रणजीत कासले यांच्या म्हणण्यानुसार, वाल्मिक कराड काही संवेदनशील माहिती उघड करणार होता, त्यामुळे त्याचा एन्काऊंटर घडवून आणण्याचा कट रचण्यात आला होता. यासाठी त्यांना पाच कोटींपासून ५० कोटींपर्यंतची ऑफर देण्यात आली होती, असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला.
कासले पुढे म्हणाले की, “धनंजय मुंडेंना मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा पाठिंबा आहे. संतोष देशमुख प्रकरणात अनेक पुरावे दडपण्यात आले आहेत, त्यामुळे मुंडेंवर कारवाई होण्याची शक्यता कमी आहे.” त्यांनी पोलिस प्रशासनालाही थेट आव्हान दिलं की, “कोणी दम असेल तर मला पकडून दाखवा!”
अट्रॉसिटी प्रकरणावर स्पष्टीकरण देताना कासले म्हणाले की, “माझ्या कोणत्याही वक्तव्याचा उद्देश कोणत्याही समाजाला दुखवण्याचा नव्हता. कुठल्याही आक्षेपार्ह गोष्टीसाठी मी माफी मागतो.”
या संपूर्ण प्रकरणामुळे बीडचे वातावरण अधिकच तापले असून, रणजीत कासले यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. प्रशासन आणि राजकीय वर्तुळात यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.