काँग्रेसकडून महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न; राजकीय वर्तुळात खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी असताना आता काँग्रेसकडून महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत असा मोठा दावा भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केलाय. तसेच येत्या काळात काँग्रेसचेही अनेक आमदार भाजपमध्ये येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. माढा विधानसभा मतदारसंघातील श्रीपूर ते खंडाळी या पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील रस्त्याचे लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर काँग्रेस आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत गेल्याने काँग्रेसचे नुकसान होईल अशी त्यांच्यामध्ये भीती आहे. त्यामुळं लवकरच काँग्रेसचे आमदार महाविकास आघाडी फोडून बाहेर पडतील. काँग्रेसकडून महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महाविकास आघाडी फुटल्यानंतर काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये सहभागी होतील. रणजितसिंह निंबाळकर यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीतील छोटा भाऊ असलेली काँग्रेस आता मोठ्या भावाच्या रूपात आहे. आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे अवघे १५-१६ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे ४४ आमदारांचा काँग्रेस आता राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष आहे, परंतु पावसाळी अधिवेशन संपत आलं तरी काँग्रेसकडून अजूनही विरोधी पक्षनेता निवडण्यात आलेला नाही हि मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. त्यामुळे काँग्रेसमध्येही सर्व काही नॉट ओके आहे का? असा प्रश्न सातत्याने निर्माण होतो.