हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू आणि T20 फॉरमॅटचा कर्णधार राशिद खानने( Rashid Khan) मोठा भीमपराक्रम केला आहे. T20 क्रिकेटमध्ये 600 बळी घेण्याचा कारनामा राशिद खानने केला आहे. द हंड्रेड मेन्स कॉम्पिटिशन 2024 सिरीजमध्ये ट्रेंट रॉकेट्सकडून खेळताना राशिद खानने हा माईलस्टोन गाठला आहे. पॉल वॉल्टर हा राशिद खानचा 600 वा बळी ठरला आहे. राशिद खानपूर्वी वेस्ट इंडिजचा अष्टपैलु खेळाडू ड्वेन ब्राव्होने T20 क्रिकेटमध्ये 600 बळींचा टप्पा पूर्ण केला आहे.
रशीद खान (Rashid Khan) हा आजच्याघडीला जगातील टॉपचा फिरकीपटू मानला जातो. अफगाणिस्तान सारख्या तुलनेनं हलक्या संघाचे प्रतिनिधित्व करत असूनही संपूर्ण जागतिक क्रिकेटमध्ये त्याने आपल्या खेळाचा ठसा उमटवला आहे. त्याच्या लेग ब्रेक फिरकीपुढे अनेक दिग्गज फलंदाजांनी गुडघे टेकलेत. राशिद खानने 441 व्या T20 सामन्यात 600 बळींचा टप्पा गाठला आहे. तर ड्वेन ब्राव्होच्या नावावर 578 टी-20 सामन्यात 630 बळी आहेत. या दोघांच्या व्यक्तिरिक्त वेस्ट इंडिजच्या सुनील नारायण (557) आणि इम्रान ताहिर (502) यांनी ५०० बळींचा टप्प्पा पार केलाय. मात्र राशिद खानने अतिशय कमी वयात हा माईलस्टोन गाठला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आणि अफगाणिस्तान क्रिकेटसाठी हि मोठी गौरवाची बाब आहे.
राशिदचा इकॉनॉमी रेट अवघा 6.47- Rashid Khan
राशिद खानने २०१५ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने 441 टी-20 सामन्यात 600 बळी घेतले आहेत. या कालावधीत त्याची सरासरी १८.२५ इतकी आहे. तर इकॉनॉमी रेट सुद्धा अवघा 6.47 आहे. गोलंदाजी शिवाय रशीद हा वेळप्रसंगी आक्रमक फलंदाजी सुद्धा करण्यास सक्षम आहे. अनेकदा त्याने तळाला फलंदाजीला येऊन मोठमोठे फटके मारून अफणिस्तानला अशक्यप्राय विजय मिळवून दिलेत. त्यामुळे प्रत्येक संघाला राशिद खान हा आपल्याकडे असावा असं वाटत.
T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज–
543 डावात 630 विकेट – ड्वेन ब्राव्हो
438 डावात 600 बळी – राशिद खान
509 डावात 557 बळी – सुनील नारायण
388 डावात 502 विकेट – इम्रान ताहिर
436 डावात 492 विकेट – शकिब अल हसन
461 डावात 462 विकेट – आंद्रे रसेल