उद्योगपती रतन टाटा यांना पहिला ‘उद्योगरत्न पुरस्कार’ जाहीर; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली आहे. महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर या वर्षापासून ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे या पुरस्काराचे पहिले मानकरी रतन टाटा ठरले आहेत. या पुरस्काराने टाटा यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान क्षेत्रात अलौकिक कामगिरी करणाऱ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यामध्ये आता उद्योगक्षेत्रात योगदान करणाऱ्या व्यक्तींना देखील सहभागी करून घेण्यात आले आहे. इथून पुढे साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना महाराष्ट्र भूषण प्रधान करण्यात येणार आहे. याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीतच पहिला पुरस्कार देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांना देण्यात यावा हा निर्णय घेण्यात आला. रतन टाटा यांनी व्यावसायिक तसेच सामाजिक क्षेत्रात अलौकिक कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना पद्मभूषणसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

कोरोना काळात रतन टाटा यांनी सरकारला मदत म्हणून १५०० कोटी रुपये दान स्वरुपात दिले होते. तसेच, टाटा समूहाकडून इतर सुविधा देखील पुरविण्यात आल्या होत्या. रतन टाटा यांचे दुसरी ओळख दानशूर व्यक्ती अशी आहे. त्यांच्या नावे अनेक कंपन्या, संस्था, एनजीओ आहेत जे समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करतात. त्यांच्या या कामगिरीमुळेच रतन टाटा यांचा जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. खास म्हणजे, यावर्षीच्या एप्रिल महिन्यात रतन टाटा यांना ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ने गौरवण्यात आले आहे. दरम्यान, नामांकित उद्योगपती रतन टाटा यांच्या आयुष्यातील प्रवासावर लवकरच एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुधा कोंगरा या रतन टाटा यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन करणार आहेत.