Raver Lok Sabha : रक्षा खडसे खासदारकीची हॅट्रिक करणार, वारं काय सांगतंय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) सुनबाई शरद पवारांच्या तुतारीपुढे टिकतील का?… नाथाभाऊ चहुबाजूने कोंडी झालेली असताना आपल्या सुनबाईला सलग तिसऱ्यांदा लोकसभेवर पाठवतील का?… रावेर मतदारसंघाचं वारं कुणाच्या बाजूने फिरतय? हे प्रश्न रावेरच्या राजकारणात सध्या पिंगा घालतायत… नाथाभाऊ विरुद्ध शरद पवार, तुतारी विरुद्ध कमळ, रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पवार यांच्यात उद्या रंगणाऱ्या सामन्यात मैदान कुणाच्या बाजूने आहे? जिंकतंय कोण? याचाच अंदाज घेऊयात

जळगाव… हे नाव काढलं तरी राजकारणातला एक चेहरा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे एकनाथ खडसे अर्थात नाथाभाऊ! 35 वर्ष आमदारकी, 20 वर्षे लाल दिवा, भाजपचं महाराष्ट्रात रोपट लावण्यापासून पक्षासोबत एकनिष्ठ असणारं नेतृत्व…पण राज्याची सूत्र फडणवीसांकडे गेली आणि खडसे पक्षातून साईडलाइन झाले. पक्षावर नाराजी असली तरी आपल्या सुनबाईंना रावेरमधून पुन्हा उमेदवारी रिपीट झाल्याने त्यांनी नाईलाजाने भाजपचं काम केलं… सुनबाईंना दुसऱ्यांदा दिल्लीत पाठवलं… पण नंतर नाथाभाऊंचा विधानसभेतूनच पत्ता कट झाला, त्यांच्या मुलीचा आमदारकीला बालेकिल्ल्यातूनच पराभव झाला… त्यात त्यांचा मागे चौकशीचा फास लागला होताच… या सगळ्याला कंटाळून नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला… घड्याळ हातात बांधून विधानपरिषद गाठली… राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गटासोबत राहत रावेरमधून (Raver Lok Sabha 2024) निवडणूक लढणार हे जगजाहीर केलं.. खरं म्हणजे भाजप आपल्या सुनबाईंचं म्हणजे रक्षा खडसे यांचं तिकीट कापणार असा अंदाज असल्याने नाथाभाऊ यांनी लोकसभा लढवायचं ठरवलं… पण भाजपने मास्टर स्ट्रोक खेळत सलग तिसऱ्यांदा रक्षा खडसे यांनाच तिकीट दिलं. आणि नाथाभाऊंची गोची केली. तब्येतीचं कारण पुढे करत आपण तुतारीकडून आपण लोकसभा लढणार नाही, असं म्हणत त्यांनी स्वतःला कव्हर अप केलं. पण राष्ट्रवादीत असल्यानं 2024 ला स्वतःच्या सुनेच्या विरोधातच राजकारण करण्याची वेळ त्यांच्यावर आली. पण जास्त वेळ न दवडता त्यांनी पुन्हा घरवापसी करत भाजपात प्रवेश केलाय. मी माझ्या घरट्यात प्रवेश केलाय लवकरच दिल्लीतील नेत्यांकडून माझा पक्षप्रवेश होईल, असं जरी त्यांनी सांगितलं असलं. तरी भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या अंतर्गत विरोधामुळे टेक्निकली नाथाभाऊ अजून भाजपात नाहीयेत… पण असं असताना देखील, आपल्या सुनबाईंना सलग तिसऱ्यांदा दिल्लीत पाठवण्यासाठी नाथाभाऊंनी मोठी फिल्डिंग लावलीय.

Raver Lok Sabha : Raksha Khadse खासदारकीची हॅट्रिक करणार, वारं काय सांगतंय?

नाथाभाऊ यांनी विविध पक्षातील असणारे आपले कार्यकर्ते, सहकारी यांना कामाला लावलंय. लेवा पाटील समाज ही नाथाभाऊंची सर्वात मोठी ताकद राहिली, या समाजाचं जास्तीत जास्त मतदान रक्षा खडसे यांनाच कसं होईल, यासाठीही नाथा भाऊंनी मतदारसंघ पिंजून काढलाय. खरंतर एकनाथ खडसे हे भाजपवर नाराज झाल्यापासूनच गिरीश महाजनांनी जिल्ह्यातील राजकीय स्पेस भरून काढायला सुरुवात केली होती. सध्या महाजन यांचा जिल्ह्याच्या राजकारणावर कंट्रोल आहे. पण महाजन आणि खडसे यांच्यातला वाद हा रावेर लोकसभेसाठी भाजपची डोकेदुखी ठरू शकते. खडसेंच्या येण्यानं महाजन कदाचित दुखावले गेलेत. त्यामुळेच रावेरपेक्षा त्यांनी त्यांचं सगळं लक्ष हे जळगावकडे लावलय. खडसेंवरचा राग काढण्यासाठी भाजपच्या या संकटमोचकाने विरोधी उमेदवाराला मदतीचा हात दिला तर रक्षा खडसेंच्या अडचणी वाढू शकतील…

पण ग्राउंडचा नीट अभ्यास केला तर मागच्या दोन्हीही निवडणुका रक्षा खडसेंनी मोठ्या मार्जिनने जिंकल्या… एकनाथ खडसेंची ताकद आणि भाजपचा असणारा पारंपारिक बालेकिल्ला यामुळे इथं विरोधक टिकताना दिसत नाही. 2009 मध्ये लोकसभेची पुनर्रचना झाल्यानंतर रावेर मतदारसंघ तयार झाला. तेव्हापासूनच इथे भाजप विरुद्ध काँग्रेस किंवा राष्ट्रवादी अशी पारंपारिक लढत होत आलीय. पण इथे भाजपाचा उमेदवार हा मोठ्या लीडने जिंकत आला. 2014 ला याच रावेरची उमेदवारी रक्षा खडसे यांना मिळाली तेव्हा काँग्रेसच्या डॉ. उल्हास पाटील तर 2019 ला राष्ट्रवादीच्या मनीष दादा जैन यांचा पराभव करत ते दोन लाखांहून जास्तीच्या लीडने खासदार झाल्या…

दुसरीकडे एकनाथ खडसे पुन्हा भाजपात गेल्याने राष्ट्रवादीकडे कोणताही तुल्यबळ उमेदवार नव्हता. तेव्हा शरद पवारांनी अनेक पर्यायांची चाचपणी केली. अखेर लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उद्योजक श्रीराम पाटील यांच्या हातात तुतारी देत रावेरची लढत फिक्स केली. त्यामुळे आता रावेरमध्ये रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील यांच्यात महामुकाबला उद्या निवडणुकीच्या दिवशी पाहायला मिळेल. पण रावेरच्या लढतीला खरंच तुल्यबळ लढत म्हणता येईल का? तर याचं उत्तर अर्थात येतं, नाही… जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, खडसेंचे कट्टर विरोधक आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि स्वतः गिरीश महाजनांचा अंतर्गत विरोध असतानाही रक्षा खडसे आरामात लोकसभेचं मैदान मारतील, अशी सध्या रावेरची परिस्थिती आहे. एकनाथ खडसेंना मानणारी एक खूप मोठी व्होट बँक मतदारसंघात आहे… त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी सलोख्याच्या संबंध आहेत…

लेवा पाटील समाजाची निर्णायक मतं ही तर नाथाभाऊंची स्ट्रेंथ राहिली आहे… त्यात भाजपच्या महाशक्तीचा बॅक सपोर्ट आहेच.. हे सगळं गणित जोडून बघितलं तर रक्षा खडसे या निवडणुकीत फार पुढे निघून जातात… दुसरीकडे शरद पवारांनी श्रीराम पाटील यांच्या रूपाने अगदीच नवखा उमेदवार रक्षा खडसेंच्या विरोधात दिल्यानं याकडे सगळेच संशयानं पाहतायत… नाथाभाऊंच्या सुनबाईंसाठी शरद पवारांनी या जागेचं साटंलोटं केल्याची चर्चाही मतदारसंघात आहे… त्यामुळेच जिल्ह्यातल्या जळगाव मतदारसंघ निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीने जितकी ताकद लावलीय त्या तुलनेत रावेरमध्ये सगळ्यांनीच सैल सोडलीय…एकूणच काय तर रक्षा खडसे या तिसऱ्यांदा लोकसभेत दिसतील…याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे रावेरच्या जागेवरून शरद पवार आणि नाथाभाऊ यांच्यात काही साटंलोट झालय का? रावेर मध्ये खासदारकीचा गुलाल कुणाला लागेल? तुमचा अंदाज काय सांगतो? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.