बच्चू कडू- रवी राणा वाद मिटणार? मुख्यमंत्र्यांकडून दोन्ही नेत्यांना वर्षावर येण्याचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी खोके घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता आणि येथूनच राणा विरुद्ध कडू हा संघर्ष सुरु झाला. दोन्ही आमदारांमधील वाद आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात असून आज एकनाथ शिंदे यांनी दोघांनाही वर्षावर बोलावलं आहे. त्यामुळे बच्चू कडू – रवी राणा यांच्यातील वाद मिटण्याची शक्यता आहे.

रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर खोके घेतल्याचा आरोप केल्यानंतर बच्चू कडू आक्रमक झाले होते. रवी राणा यांनी आपल्यावर केलेले आरोप १ तारखेपर्यन्त सिद्ध करावे अन्यथा आपण वेगळा निर्णय घेऊ असा अल्टिमेटमच बच्चू कडू यांनी सरकारला दिला. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करणार आहेत. बच्चू कडू आधीच मुंबईत आहेत तर रवी राणा हे मुंबईसाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे मुखयमंत्री नेमका काय मार्ग काढणार हे पाहावं लागणार आहे.

रवी राणा आणि बच्चू कडू हे दोघेही अमरावती जिल्ह्यातून येतात. त्यांच्यातील संघर्षांच्या ठिणगी मागे स्थानिक राजकारण असलयाचे बोललं जात आहे. बच्चू कडू आपला प्रहार पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत तर दुसरीकडे रवी राणा यांचा युवा स्वाभिमानी पक्ष आहे. रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. तर बच्चू कडू हे एकनाथ शिंदे समर्थक आहेत. त्यातच आगामी मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू आणि रवी राणा हे दोघेही मंत्रिपदासाठी उत्सुक आहेत. त्यापार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवण्यात शिंदे- फडणवीसांना यश मिळत का हे पाहावं लागेल.