पोलिसाच्या वेशात रविकांत तुपकरांचा आत्मदहनाचा प्रयत्न; सोयाबीन, कापूस प्रश्नासंदर्भात आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राज्य सरकारने लक्ष घालावे नाहीतर बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनकरू, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला होता. दरम्यान, त्यांनी पोलिसाच्या वेशात येऊन मोर्चावेळी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतलं त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.

सोयाबीन, कापूस दरवाढ नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहेत तसेच पीक विमाची रक्कम, अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नसून ती तत्काळ द्यावी, अशी मागणी तुपकर यांनी केली होती. तर मागील तीन महिन्यापासून तुपकरांकडून आंदोलन केले जात आहे. तुपकर यांच्या या आंदोलनाकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते.

शेतकरी प्रश्नासंदर्भात स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी 10 तारखेपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा 11 फेब्रुवारीला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा AIC विमा कंपनीच्या मुंबई स्थित कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

 

त्या दिवसापासून रविकांत तुपकर हे भूमिगत आहे. ते नेमके कुठे आहेत? त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. ते भूमिगत झाल्यामुळे पोलिसांचे टेन्शन वाढले होते. दरम्यान, तुपकरांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपला आणि तुपकर आपल्या शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.