रयत क्रांती शेतकरी संघटनेतर्फे कोरेगावमध्ये रास्ता रोको आंदोलन; पहिली उचल 3000 देण्याची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला पहिली उचल एकरकमी ३००० रूपये आणि कारखाने बंद झाल्यावर ५०० रूपये दर द्यावा या मागणीसाठी सातारा जिल्हा रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने कोरेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रयत क्रांतीचे अध्यक्ष आ.सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांतीचे सातारा जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, युवा आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे तसेच सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.कोरेगावात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी आंदोलन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत कित्येक दिवस वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न उपस्थित करून आंदोलन करत आहोत परंतु, प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही.अद्याप शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. जिल्ह्यातील साखर कारखाने गेल्या दोन महिन्यांपासून सुरू झाले असून, उस दराच्या अनुषंगाने साखर कारखान्यानी अत्यंत कमी म्हणजे २२०० ते २३०० रूपये एवढा उस दर जाहीर केलेला आहे. हा दर आम्हास मुळीच मान्य नसून, कारखान्यांनी उसाला पहिली उचल एकरकमी ३००० रूपये आणि कारखाने बंद झाल्यावर ५०० रूपये दर द्यावा, अशी मागणी रयत क्रांती शेतकरी संघटनेने प्रशासनाला केली आहे.

कारखान्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने एक रक्कमी ऊस दर देऊ शकतात. साताऱ्यातील काही कारखाने देऊ शकतात. तर बाकीचे का नाही. यासाठीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध अडचणी करीता वारंवार निवेदने, आंदोलने, मोर्चे काढून ही शेती आणि ऊस पिक याकडे न बघता बेकायदेशीरपने वागणाऱ्या साखर कारखानदारांना पाठिशी घालत असलेल्या सरकार तसेच सातारा जिल्हा प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी, सातारा जिल्ह्यातील तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रयत क्रांतीचे अध्यक्ष आ.सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांतीचे सातारा जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, युवा आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे तसेच सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.कोरेगावात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.यावेळी आंदोलन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले