हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील तरुणांना कंत्राटी पद्धतीने (Contract Method) नोकऱ्या देण्याच्या मोहिमेवर राज्य सरकारने जोर धरला आहे. सरकारकडून सेवापुरवठादार संस्थांची निवड करून बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून कंत्राटी भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या वेगवेगळ्या क्षेत्रात विविध पदांसाठी कंत्राटी भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत सरकारने 4 विभागांतील 11 हजार 203 जागांवर कंत्राटी भरतीचे निर्णय जाहीर केले आहेत. आता पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यात कंत्राटी पद्धतीने 1 लाख पदे भरण्याचा विचार सरकार करत आहे.
कंत्राटी पद्धतीने नोकर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आल्यामुळे त्याला तरुणांकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. या मुद्द्याला घेऊन राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. मात्र तरी देखील सरकार कंत्राटी पद्धतीचा वापर करत आहे. यासाठी सरकारने वेगवेगळ्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देखील दिले आहे. ज्यांच्याकडून कंत्राटी नोकर ( Job Recruitment) भरतीची घोषणा करण्यात येत आहे. आता पुन्हा एकदा सरकारकडून नोव्हेंबर महिन्यात कंत्राटी पद्धतीने 1 लाख पदे भरली जाण्याची घोषणा करण्यात येणार आहे.
या पदांसाठी होणार भरती
नोव्हेंबर महिन्यामध्ये जी 1 लाख कंत्राटी पदे भरली जातील त्यामध्ये, जलसंपदा विभाग, महसूल विभाग, कृषी विभाग अशा इतर सर्व विभागांचा समावेश असणार आहे. त्यानुसार, गृह व नियोजन विभागामध्ये 5 हजार पदे, जलसंपदा विभागामध्ये 8 हजार पदे, आदिवासी विभागामध्ये 2 हजार पदे, ग्रामविकास विभागात 5 हजारांवर पदे, उच्च व तंत्रशिक्षण विभागामध्ये ६ हजार पदे, कृषी विभागामध्ये 3 हजार पदे, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामध्ये 5 हजार पदे, वन विभागामध्ये 5 हजार पदे, शालेय शिक्षण विभागात 6 हजार पदे, अशा सर्व विभागांमध्ये विविध पदांसाठी कंत्राटी नोकरदारांची भरती करण्यात येणार आहे.
मुंबई पोलीस विभाग
दरम्यान मुंबई पोलीस विभागात देखील 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. नवीन पोलीस भरती होईपर्यंत 11 महिन्यांच्या कालावधीसाठी 3 हजार कंत्राटी पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या 3 हजार कंत्राटी पोलिसांना पगार देण्यासाठी 30 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. सध्या मुंबई पोलीस विभागात मनुष्यबळाची कमतरता जाणून लागल्यामुळे ही भरती करण्यात येणार आहे.