Saturday, February 4, 2023

तब्बल ७० हजाराला विकले रेमडीसीवीर, तिघांना अटक

- Advertisement -

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात कोरोना धोकादायक रित्या पसरत आहे. काही ठिकणी रुग्णांना बेड मिळत नाहीयेत तर काही ठिकाणी कोरोनावर प्रभावी उपचार म्हणून वापरल्या जाणाऱ्या रेमडीसीवरचा तुटवडा जाणवत आहे. मात्र रेमडीसीवीरच्या काळयाबाजाराबाबत एक धक्कादायक माहिति पुढे आली आहे. दिल्लीतील एका मेडिकल स्टोअर विक्रेता चक्क ७०,००० रुपयांना एक रेमडीसीवीर विकत असल्याचे समोर आले आहे. या घटनेत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याजवळून ७ रेमडीसीवीर जप्त करण्यात आले आहेत.

याबाबत मिळलेली अधिक माहिती अशी की , लीखित गुप्ता, अनुज जैन आणि आकाश वर्मा अशी या तिन्ही आरोपींची नावे आहेत. लिखित व अनुज चांदणी चौक परिसरात औषध दुकान चालवतात, तर आकाश व्यवसायाने ज्वेलर आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या रॅकेटमध्ये सामील असलेल्या इतर लोकांचा शोध घेण्यासाठीही तपासणी सुरू केली आहे. कोरोनाच्या वाढत्या घटनांबरोबरच रेमडीसीवीर इंजेक्शनची मागणीही बरीच वाढली आहे. अशा परिस्थितीत काळा बाजार करणारे लोक अधिक किंमतींनी हे इंजेक्शन विकत आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्रातही रेमडीसीवीरचा काळाबाजार , मिरजेत ३० हजारांना विकले इंजेक्शन

सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. अशातच रेमडीसीव्हीर इंजेक्शनची मागणी देखील वाढत आहे. याचाच गैरफायदा उचलत अव्वाच्या सव्वा दराने गरजू रुग्णांना हे इंजेक्शन विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश सांगली पोलिसांनी केला आहे. जीवनावश्यक वस्तूमध्ये समावेश असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनच काळ्याबाजाराने विकत असताना मिरज शासकीय रुग्णालयातील अधिपरीचारकासह एका खाजगी लॅब टेक्निशियनला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून अटक केली.

अधिपरीचारक सुमित सुधीर हुपरीकर (वय ३२ रा.समृध्दीनगर, विश्रामबाग) व लॅब टेक्नेशियन असलेला दाविद सतिश वाघमारे (वय २५, रा. कुपवाड रोड, विजयनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघांनी यापूर्वी ८९९ रुपयांचे इंजेक्शन ३० हजार रुपयांना एक असे दोन इंजेक्शन विकल्याचे कबुली दिली आहे. या दोघांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम तसेच औषध प्रशासन अंतर्गत विश्रामबाग पोलिसात गुन्ह दाखल झाला आहे.