जम्मू-काश्मीरमध्ये कराडच्या सुपूत्राने 20 वर्षांपूर्वी केला होता ‘हा’ पराक्रम!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामुल्ला जिल्ह्यातील मंडना हछिनारच्या जंगलात ४ नोव्हेंबर २००३ रोजी २५ दहशतवाद्यांनी जवानांवर अचानक हल्ला केला होता. त्यामध्ये एक जवान शहीद झाला होता तर गोळ्या लागून तिघांच्या हातापायाची चाळण झाली होती. कराड तालुक्यातील साकुर्डी गावचा सुपूत्र कृष्णत केंजळे यांचाही त्यात समावेश होता. जीवाची पर्वा न करता केंजळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्या घटनेला आज २० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने सेवानिवृत्त जवान कृष्णत केंजळे यांनी आज त्या घटनेला उजाळा दिला.

दि. ४ नोव्हेंबर २००३ रोजी बारामुल्ला जिल्ह्यातील जंगलात सर्च ऑपरेशन सुरू असताना अचानक दहशतवाद्यांनी हल्ला केला. चकमकीत जवान कृष्णत केंजळे यांच्या उजव्या दंडात तीन गोळ्या घुसल्या. त्याही अवस्थेत त्यांनी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. गंभीर जखमी अवस्थेत हेलिकॉप्टरने त्यांना श्रीनगरमधील ९२ बेस’ या लष्करी रुग्णालयात आणण्यात आले. त्या ठिकाणी त्यांच्या दंडावर मोठी शस्त्रक्रिया झाली. ३० दिवसांच्या उपचारानंतर त्यांना विश्रांतीसाठी सुट्टी देऊन घरी पाठवण्यात आले होते.

कृष्णत केंजळे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर १९९६ ला ते सैन्य दलात भरती झाले. राष्ट्रीय रायफल्स रेजिमेंटमध्ये ते जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असताना दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झाले होते. एक महिना श्रीनगर येथे तर दोन महिने पुण्यातील लष्करी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पूर्णपणे बरे झाल्यानंतर पुन्हा ते देशसेवेत रुजू झाले होते. २० वर्षांच्या सेवेनंतर २०१६ साली नाशिक येथे ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी साकुर्डी येथे तरुण-तरुणींसाठी के. के. अकॅडमी सुरू केली आहे. सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांना ते प्रशिक्षण देत आहेत.

याबाबत ‘हॅलो महाराष्ट्र’ने सेवानिवृत्त जवान केंजळे यांच्याशी संपर्क साधला असता केंजळे यांनी वीस वर्षांपूर्वी आजच्या दिवशी घडलेल्या घटनेला उजाळा दिला. केंजळे म्हणाले की, ४ नोव्हेंबरला राष्ट्रीय रायफल्स रेजिमेंटचे जवान जंगलात गस्त घालत होते. त्यावेळी आमचा दहशतवाद्यांशी सामना झाला. दोन्ही बाजूने फायरींग सुरू झाली. त्यात आमचा सहकारी शहीद झाला. आणखी दोघांच्या हातापायात गोळ्या घुसल्या. मीही गंभीर जखमी झालो होतो. मात्र, तशा स्थितीतही तीन दहशतवाद्यांना ठार केले.

माझ्या उजव्या दंडातून तीन गोळ्या आरपार गेल्या होत्या. त्यामुळे हाताच्या शिरा तुटून रक्तस्त्राव सुरू झाला होता. तशा अवस्थेत मला हेलिकॉप्टरने श्रीनगर येथील लष्करी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मांडीची नस काढून शस्त्रक्रियेने ती हाताला जोडण्यात आली. त्यामुळे उजव्या हाताची रक्तवाहिनी सुरू झाली. ५ तासाच्या शस्त्रक्रियेनंतर माझी मरण यातनेतून सुटका झाल्याचे त्यांनी सांगितले.

कारगीलच्या कारवाईतही एका अतिरेक्याला ठार केल्याचे सांगून केंजळे म्हणाले, आमच्या राष्ट्रीय रायफल्स बटालियनचा अनेक वेळा अतिरेक्यांशी सामना झाला होता. त्यामुळे अशा चकमकी आमच्यासाठी नवीन नव्हत्या. जखमी झाल्यानंतर पहिल्यांदा श्रीनगर आणि काही दिवसांनी पुण्याच्या लष्करी रुग्णालयात उपचार घेऊन बरा झालो. त्यानतर पुन्हा देशसेवेत रुजू झालो, असे केंजळे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना सांगितलं.