सध्या दिवाळीचा हंगाम सुरू असून दिवाळीमध्ये सुट्टीचा कालावधी असतो. या सुट्टीच्या कालावधीमध्ये जर तुम्ही कोकणात फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण कोकण रेल्वे कडून रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. हा बदल बिगर पावसाळी गाड्यांच्या वेळापत्रकात करण्याचा निर्णय कोकण रेल्वे कडून घेण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या गाड्यांच्या फेऱ्यानुसार सुधारित वेळपत्रकाची १ नोव्हेंबर पासून अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही रेल्वे मार्गे कोकणात फिरायला जाण्यासाठी प्लॅन करत असाल तर मात्र बदललेल्या वेळापत्रक लक्षात घेऊन तुम्ही तुमचे नियोजन करायला हरकत नाही.
सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोकण भागात नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीमध्ये लोक आवर्जून हजेरी लावत असतात. नोव्हेंबर मध्ये दिवाळीच्या सुट्टीचा हंगाम तसेच डिसेंबर मध्ये क्रिसमसच्या सुट्ट्या अशा दोन्ही महिन्यांमध्ये सुट्ट्या लागून आल्यानं जवळचे सुंदर समुद्रकिनारे फिरण्यासाठीचे ठिकाण म्हणून कोकण समुद्रकिनाऱ्यांना लोकांची पसंती असून अनेक जण या ठिकाणी भेटी देत असतात. त्यात कोकण रेल्वे आल्यामुळे या काळामध्ये कोकण रेल्वेला गर्दी देखील असते मात्र एक नोव्हेंबर पासून कोकण रेल्वेच्या काही गाड्यांचे वेळापत्रक आणि वेळ बदलण्यात आली आहे चला जाणून घेऊया…
करमाळी लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस
करमाळी लोकमान्य टिळक टर्मिनल (२२११६) एक्स्प्रेसचा कणकवली स्थानकात सांयकाळी ४:२२ ऐवजी ४:३२ मिनिटांनी पोहचणार आहे. ७ नोव्हेंबरपासून हा बदल लागू होणार आहे. त्याचप्रमाणे वास्को द गामा पटणा (१२७४१) एक्स्प्रेसची रत्नागिरी स्थानकावर पोहोचण्याची सुधारित वेळ रात्री १२:३५ वाजता असणार आहे. तर मुंबई सीएसएमटी ते मडगाव जंक्शन मांडवी एक्स्प्रेस नडवली स्थानकात दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी पोहचणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनल – मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेस
लोकमान्य टिळक टर्मिनल – मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेस चिपळूण स्थानकावर सायंकाळी ७:४२ वाजता पोहचेल. १ नोव्हेंबरपासून हे वेळापत्रक लागू होणार आहे. एर्नाकुलम जंक्शन अजमेर (१२९७७), कोचुवेली – पोरबंदर एक्स्प्रेस (२०९०९), भावनगर – कोचुवेली (१९२६०) तसेच पोरबंदर ते कोचुवेली (२०९१०) एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल केल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.
दिवाळीसाठी विशेष गाड्यांची सोय
मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी रेल्वेच्या 570 विशेष सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातील 180 गाड्या राज्यात धावणार आहेत. लातूर, सावंतवाडी रोड, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणाहून धावणार आहेत. तर, 378 सेवा या उत्तर भारतातील दानापूर, गोरखपूर, छपरा, बनारस, समस्तीपूर, आसनसोल, आगरतळ, संत्रागाछी या विविध भागातील प्रवाशांसाठी आहेत.