‘कचरा पुन्हा कचराकुंडीत गेला; लालूंच्या मुलीचा नितीशकुमारवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । बिहारच्या राजकारणात (Bihar Politics) आज मोठी उलथापालथ झाली. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडी सोबत फारकत घेऊन भाजपसोबत सत्तास्थापनेचा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांनी अचानक बदललेल्या भूमिकेमुळे बिहारच्या राजकारणाला नवं वळण मिळणार आहे. या सर्व पार्शवभूमीवर लालूप्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य (Rohini Acharya) यांनी नितीशकुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. रोहिणी आचार्य यांनी नितीशकुमार यांचा उल्लेख कचरा असा केला आहे.

रोहिणी आचार्य यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून एक पोस्ट केली आहे. कचरा पुन्हा कचराकुंडीत गेला. कचराकुंडी मंडळाला दुर्गंधीदायक कचरा लखलाभ…असं म्हणत त्यांनी कचरा कुंडीत कचरा टाकतानाचा फोटोही शेअर केला आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षपणे नितीश कुमार याना लक्ष्य केलं आहे. तसेच ज्याची विचारधारा गिरगिट कुमार आहे त्याच्यासोबत राहणे व्यर्थ आहे असं म्हणत रोहिणी आचार्य यांनी आपला संताप व्यक्त केला. रोहिणी आचार्य यापूर्वी सुद्धा सतत आपल्या कुटुंबियांसाठी आक्रमक पणे भूमिका मांडताना दिसल्या आहेत.

दरम्यान, आज सकाळीच नितीशकुमार यांनी आपला राजीनामा राज्यपालांच्या हाती सुपूर्द केला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी इंडिया आघाडीवर टीका केली. महाआघाडीतील परिस्थिती चांगली नव्हती, त्यामुळे मी हे पाऊल उचलले आहे . मी बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही गोष्टीवर भाष्य करत नाही. माझ्या कार्यकर्त्यांसह सर्वांची मते आणि सूचना मला मिळत होत्या. त्या सर्वांचे म्हणणे ऐकून मी आज राजीनामा दिला असं त्यांनी म्हटलं. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नितीशकुमार यांनी भूमिका बदलल्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. नितीशकुमार हेच इंडिया आघाडीच्या एकजुटी साठी सर्वात आधी पुढे आले होते मात्र आता त्यांनीच वेगळा निर्णय घेतल्याने इंडिया आघाडीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.