कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचे समाज माध्यमांवर बदनामी होत असल्याने “दक्ष कराडकर” या व्हाट्सअप ग्रुपवर गुन्हा दाखल करण्याची लेखी तक्रार पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्याकडे स्वतः नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी दिले आहे.
यावेळी उमेश शिंदे, मुकुंद चरेगावकर, एकनाथ बागडी उपस्थित होते. गेली ४ वर्षे कराड नगरपरिषदेची लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून कार्यरत आहे. सामाजिक जीवनात वावरत असताना पदाची प्रतिष्ठा जपण्याचे काम कसोशीने पार पाडत आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून कराड शहरातील “दक्ष कराडकर” सोशल मिडिया ग्रुपमधून नाव न घेता तसेच कोणतीही शहानिशा न करता जाणून बुजून माझी बदनामी करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. यामध्ये WHATSAPP GROUP, FACEBOOK पेज सामील आहेत.असे तक्रारी अर्जात नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी म्हटले आहे.
नगराध्यक्षा म्हणून शासनाने दिलेल्या अधिकार व शासकीय अधीनियामानुसारच सर्व बाबी तपासूनच कामकाजाची पुढील कार्यवाही होत असते. माझी वाढती लोकप्रियता सहन होत नसल्याने विरोधकांना हाताशी धरून अपूर्ण माहितीच्या आधारे माझ्यावर खोटेनाटे आरोपांची राळ उठवण्यात येत आहे. यामुळे माझ्या समाजिक जीवनातील प्रतिमेला तडा जात असून मला नाहक त्रास होत आहे. असे तक्रार पत्रात नमूद केले असून माझ्यावर होणाऱ्या आरोपांची शहानिशा करून “दक्ष कराडकर” ग्रुपवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई त्वरित करण्यात यावी. आणि माझी होणारी नाहक बदनामी थांबवण्यात यावी. असे तक्रार पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, सदर ग्रुपचे अॅडमिन प्रमोद पाटील यांनी दक्ष कराडकर ग्रुपला लोकप्रियता मिळत असलेनेच नगराध्यक्षा शिंदे यांनी ग्रुपविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असल्याचे म्हटले आहे. दक्ष कराडकर हा अतिशय चांगला व्हाॅट्सअॅप ग्रुप असून शहरातील नागरिक यामध्ये आपली मते रोखठोकपणे नोंदवत असतात. नागरिकांना आपली मते उघडपणे मांडण्याचा अधिकार नाही का असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.