शरद पवार की अजित पवार? R. R. पाटलांचे सुपुत्र रोहित पाटलांचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात काल सर्वात मोठा भूकंप घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या ३० पेक्षा जास्त समर्थक आमदारांसह शिंदे- फडणवीसांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि अन्य ८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच उभी फूट पडली असून शरद पवार आणि अजित पवार असे २ गट पडलेत. यानंतर स्वर्गीय आर. आर. पाटलांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी आपण शरद पवारांसोबत आहोत अशी घोषणा करून टाकली आहे.

आज गुरुपौर्णिमेनिमित्त शरद पवार हे कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. त्यानिमित्त रोहित पाटील हे सुद्धा कराडमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हंटल कि, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तळागाळापर्यंत पोचलेला पक्ष आहे. त्यामुळे निश्चितपणे पक्ष सर्वसामान्यांच्या ताकदीवर पुन्हा उभा राहील. सर्वसामान्य माणसाची नाळ शरद पवार साहेबांशी जोडली गेली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला काही फरक पडणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वात मोठ्या भूकंपानंतर आज शरद पवार हे कराड दौऱ्यावर आहे. शरद पवार यांचे गुरु असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे ते दर्शन घेणार आहेत. कराडमध्ये शरद पवार आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित सुद्धा करणार आहेत. शरद पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी कराड मध्ये केली आहे. शरद पवार नेमकं काय बोलणार? त्यांची पुढची रणनीती नेमकी काय असणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य आहे.