रोहित पवारांकडून कोकाटेंचा नवा Video व्हायरल; म्हणाले, नाईलाजाने मला सत्य…..

Manikrao Kokate Video r
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा सभागृहात ऑनलाईन रमीचा खेळतानाचा विडिओ व्हायरल झाल्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) चांगलेच गोत्यात आले आहेत. कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. मात्र गिरे तो भी टांग उपर असं म्हणत कोकाटे यांनी मी राजीनामा का देऊ? असा प्रश्न पत्रकारांना केला. तसेच मला रमी खेळता येत नाही… मी जाहिरात स्किप करतो होतो. त्यामुळे ज्या ज्या राजकीय नेत्यांनी माझी बदनामी केली त्यांना मी कोर्टात खेचणार आहे असा उलट इशारा माणिकराव कोकाटे यांनी विरोधकांना दिला. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कोकाटे यांचा आणखी एक नवा विडिओ पोस्ट करत बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे .

काय आहे रोहित पवारांची पोस्ट –

रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचे आणखी २ विडिओ आज सोशल मीडियावर शेअर केले. त्यामध्ये कोकाटे हे पत्त्यांची पाने स्वतःच्या बोटाने इकडे तिकडे सरकवत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या पोस्टमध्ये रोहित पवारांनी म्हंटल, सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा… आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो? विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय.. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती.

विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय.. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता? #राजीनामा द्यावाच लागेल…

माणिकराव कोकाटे यांनी काय म्हंटल होते-

मला रमी खेळता येत नाही. ऑनलाईन रमी सुरू झाल्यापासून आजपर्यंत एक रुपयाची रमी खेळलो नाही. मी मोबाईल उघडताच तो गेम आला. तो स्किप करता आला नाही. त्यामुळे हे सर्व आरोप खोटे आहेत, बिनबुडाचे आरोप आहेत. माझी राज्यभरात बदनामी झाली आहे. ज्या ज्या राजकीय नेत्यांनी माझी बदनामी केली त्यांना मी कोर्टात खेचणार आहे असा उलट इशारा माणिकराव कोकाटे यांनी विरोधकांना दिला होता.