हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल 2025 साठी प्लेयर रिटेन्शन आणि मेगा लिलावाची चर्चा सतत सुरु असते. फ्रेंचायजी किती खेळाडूंना कायम ठेवणार आणि कोणाकोणाला पुन्हा लिलावात उतरवणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा मुंबई इंडियन्स मधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा नेहमीच सुरु असतात. आता तर आणखी एक बातमी काही वृत्तपत्रात पसरत आहेत त्यानुसार जर रोहित शर्मा मेगा लिलावात उतरला तर दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपरजायंट त्याच्यासाठी तब्बल 50 कोटींची बोली लावण्याच्या तयारीत आहेत.
आयपीएल 2025 पूर्वी, सर्व संघांना फक्त काहीच खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी असेल. अशा परिस्थितीत जर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला (Rohit Sharma) रिलीज केलं तर तो लिलावात दिसणार आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की जर रोहित शर्मा लिलावात आला तर त्याच्यासाठी ऐतिहासिक बोली लावली जाणार आहे. रिपोर्टनुसार, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स कोणत्याही परिस्थितीत रोहितला आपल्या संघात घेण्याच्या प्रयत्नात आहेत. रोहित शर्मासाठी दोन्ही संघाची तब्बल 50 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी आहे . असं झाल्यास आयपीएल इतिहासातील हा नवा इतिहास असेल. मात्र, या बातमीत किती तथ्य आहे हे सांगणे कठीण आहे.
रोहितने मुंबईला तब्बल 5 वेळा IPL ट्रॉफी जिंकवून दिली-
दरम्यान, रोहित शर्मा हा आयपीएल मधील दिग्गज खेळाडू आहे. २००८ पासून म्हणजे आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून रोहित खेळतोय. सुरुवातीला तो डेक्कन चार्जर्स कडून खेळत होता, त्यानंतर २०११ मध्ये तो मुंबईच्या गोटात आला. रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स हे नातं अतिशय घट्ट जमलं. वानखेडे स्टेडियम फक्त रोहितची फटकेबाजी पाहायला फुल्ल भरते. रोहित शर्माने मुंबईला तब्बल ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिली आहे. यादरम्यान त्याने अनेक नवीन खेळाडू घडवले. यापूर्वी आयपीएल 2022 पूर्वी मुंबई संघाने रोहितला 16 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. पण गेल्या हंगामात मुंबईने हार्दिक पांड्याला आपल्या संघात घेतलं आणि थेट कर्णधार बनवल्यानंतर मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा यांच्यात काही ठीक नसल्याच्या बातम्या नेहमीच सुरु असतात.