Rohit Sharma Birthday : वनडे मध्ये 3 द्विशतके, 6 IPL ट्रॉफी; रोहितचे 5 बडे Record पहाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा आज 30 एप्रिल रोजी वाढदिवस आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये एकामागून एक दमदार रेकॉर्ड करून भारताची मान आनंदाने उंचावणारा आपला रोहित आज 36 वर्षांचा झाला आहे. 23 जून 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण करणारा रोहित आजही भारतीय क्रिकेटचा मुख्य आधारस्तंभ आहे. आपल्या आक्रमक आणि शैलीदार फलंदाजीने जगातील भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या रोहितच्या नावावर असे काही रेकॉर्ड आहेत जे तोडणं जवळजवळ अशक्य आहे. आज रोहितच्या वाढदिवशी आम्ही तुम्हाला त्यांच्या 5 मोठ्या विश्वविक्रमाबद्दल सांगणार आहोत.

1) एकदिवसीय क्रिकेट मध्ये 3 द्विशतके

जिथं 1 द्विशतक मारताना बॅट्समन घायला येतो तिथे रोहितने तब्बल 3 वेळा डबल सेंचुरी मारली आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. रोहितने 2013 मध्ये बेंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2014 मध्ये कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर श्रीलंकेविरुद्ध 264 आणि 2017 मध्ये मोहालीमध्ये श्रीलंकेविरुद्धच नाबाद 208 धावांची खेळी केली होती. रोहितचे हे रेकॉर्ड तोडणं नक्कीच येड्यागबाळ्याचे काम नाही.

2) T -20 मध्ये 4 शतके-

रोहितला क्रिकेट जगतात हिटमॅन म्हणतात…. आपल्या आक्रमक फलंदाजीने त्याने भल्याभल्या गोलंदाजांचे वाभाडे काढले आहेत. रोहित शर्माच्या नावावर टी-20आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार शतके आहेत. अशी कामगिरी करणारा सुद्धा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याने 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धर्मशाला येथे 106 धावा, 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 118 आणि 2018 मध्ये ब्रिस्टलमध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाद 100 आणि त्याच वर्षी लखनऊमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 111 धावा ठोकल्या आहेत.

3) एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक शतके –

रोहित शर्मा हा एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक शतके ठोकणारा खेळाडू ठरला आहे. त्याने 2019 वर्ल्ड कप मध्ये पाच शतके झळकावली. यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 122, पाकिस्तानविरुद्ध 140, इंग्लंडविरुद्ध 102, बांगलादेशविरुद्ध 104 आणि श्रीलंकेविरुद्ध 103 धावांचा समावेश आहे.

4) 6 IPL ट्रॉफी

6 IPL ट्रॉफी जिंकणारा रोहित हा आयपीएल इतिहासातील एकमेव खेळाडू आहे. 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळताना त्या चॅम्पियन संघाचा रोहित सुद्धा भाग होता. आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना तब्बल ५ वेळा त्याने मुंबईला आयपीएल जिंकवून दिली आहे.

५) मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन करणारा लाडका मुंबईकर –

रोहित शर्मा हा मुलाचा मुंबईकरच, परंतु आयपीएलच्या पहिल्या 3 सीजन मध्ये तो डेक्कन चार्जर्सच्या संघात होता. परंतु त्यानंतर तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आला आणि त्याने मुंबईचे नशीबच बदलले. मुंबईच्या चाहत्यांनी सुद्धा रोहितला खूप प्रेम दिले. रोहितने आपल्या कल्पक नेतृत्त्वाचा जोरावर मुंबई इंडियन्सला तब्बल 5 वेळा आयपीएल चॅम्पियन केलं. त्याने 2013, 2015, 2017 , 2019 आणि 2020 असे 5 वेळा मुंबईच्या संघाला आयपीएल ट्रॉफी मिळवून दिली. रोहित शर्मा हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो.