हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्सने पहिले दोन्ही सामने गमावल्यानंतर आज कोणत्याही परिस्थितीत कोलकाता विरुद्ध विजय मिळवायचाच या हेतूने पलटण मैदानात उतरेल. आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा स्टार सलामीवीर रोहित शर्माकडे (Rohit Sharma) मोठा इतिहास रचण्याची संधी आहे. कोलकाता विरुद्ध १००० धावा पूर्ण करण्याचा चान्स रोहितकडे आहे. असं झाल्यास तो आयपीएल इतिहासातील पहिला फलंदाज ठरेल जो केकेआर विरुद्ध हा कारनामा करेल.
रोहित शर्माची (Rohit Sharma) बॅट कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध कायमच तळपत राहिली आहे. रोहितने आयपीएल मध्ये जे एकमेव शतक झळकवलं आहे ते सुद्धा केकेआर विरुद्धच आलं आहे. वानखेडे स्टेडियम असो वा ईडन गार्डन असो, रोहित शर्माने प्रत्येक वेळी कोलकात्याच्या गोलंदाजांची पिसे काढली आहेत. आत्तापर्यंत रोहित शर्माने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध ९५४ धावा केल्या आहेत. आज त्याला १००० धावा पूर्ण करण्याची संधी असेल. यपीएल २०२५ च्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहित एमआयसाठी बॅटने काही खास कामगिरी करू शकला नाही, परंतु जेव्हा मुंबई इंडियन्सचा संघ वानखेडे स्टेडियमवर त्यांच्या तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना करेल तेव्हा त्याच्याकडे ऐतिहासिक विक्रम रचण्याची उत्तम संधी असेल.
मुंबई विरुद्ध आणि केकेआर सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज– Rohit Sharma
९५४ – रोहित शर्मा (१२८.०५ स्ट्राईक रेट )
५९० – सूर्यकुमार यादव (१४९.७४ स्ट्राईक रेट )
३६२ – वेंकटेश अय्यर (१६५.२९ स्ट्राईक रेट )
३४९ – गौतम गंभीर (११५.९४ स्ट्राईक रेट )
३२७ – मनीष पांडे (१३५.१२ स्ट्राईक रेट )
सध्या रोहित शर्मा म्हणाव्या अशा फॉर्म मध्ये आहे. आयपीएल २०२५ च्या पहिल्या सामन्यात रोहित आपले खातेही उघडू शकला नाही आणि दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध फक्त ८ धावांवर बाद झाला. आता तिसऱ्या सामन्यात मुंबईच्या चाहत्यांना रोहितकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा असेल, जेणेकरून मुंबई संघ घरच्या मैदानावर खेळताना हंगामातील पहिला विजय मिळवू शकेल.