भारत हारला, पण रोहित लढला; Hitman च्या लढाऊ वृत्तीने जिंकली मने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा ५ धावांनी निसटता पराभव झाला. बांगलादेशने दिलेल्या 272 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची मजल 266 धावांपर्यंतच पोचली. मात्र कर्णधार रोहित शर्माच्या लढाऊ वृत्तीने चाहत्यांचे मन जिंकले. दुखापतीमुळे बाहेर गेलेला रोहित भारताच्या विजयासाठी पुन्हा मैदानात उतरला आणि चौफेर फटकेबाजी सुद्धा केली पण अखेरच्या चेंडूवर भारताच्या पदरी निराशा आली.

प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना रोहितच्या हाताला दुखापत झाली आणि तो मैदानाबाहेर गेला. त्यानंतर बांग्लादेशच्या संघाने भारताला 272 धावांचे तगडे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची आघाडीची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली. मधल्या फळीतील अक्षर पटेल आणि श्रेयश अय्यर वगळता इतर फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकली. श्रेयश अय्यरने 102 चेंडूत 82 आणि अक्षर पटेलने 56 चेंडूत 56 धावा केल्या. मात्र हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर भारताच्या विजयाच्या आशाही मावळल्या होत्या. त्यातच दुखापतीमुळे बाहेर असलेला कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीसाठी उतरेल कि नाही याबाबत सुद्धा शंका होती.

मात्र संघाची गरज ओळखून अखेर रोहित 9 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. रोहितच्या सोबतीला फक्त भारताची तळाची फलंदाजी होती. हाताला दुखापत झाली असतानाही रोहितने चौफेर फटकेबाजी करत बांगलादेशच्या गोलंदाजांची पिसे काढली. अवघ्या 28 चेंडूत 51 धावांची तडाखेबंद खेळी खेळताना रोहितने 3 चौकार आणि 6 षटकार ठोकले. भारताची हार समोर दिसत असताना रोहितच्या खेळीने पुन्हा एकदा विजयची आशा दिसली. अखेर 12 बॉल मध्ये 40 धावांची गरज असताना रोहितने मोहमदुल्लाच्या 49 व्या षटकात 20 धावा चोपलया. अखेच्या ओव्हर मध्ये पुन्हा 20 धावांची गरज असताना रोहितने पुन्हा 1 चौकार आणि 1 षटकार ठोकत भारताच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र अखेरच्या चेंडूवर 6 धावांची गरज असताना मात्र सिक्स मारण्यात रोहितला अपयश आलं आणि भारताचा 5 धावांनी पराभव झाला. परंतु भारतीय संघ जरी हरला असला तरी रोहितच्या लढाऊ वृत्तीचे मात्र कौतुक होत आहे.