अमरावती प्रतिनिधी । आरटीओने वाहनधारकांना काही नियम घालून दिलेले आहेत. मात्र या नियमांचे उल्लंघन होताना बऱ्याच वेळा पाहण्यात येते. त्यामुळे वाहनधारकांना कारवाईला सामोरे जावे लागते. यामध्ये प्रामुख्याने वाहनमालकाच्या नावावर चालक परवाना नसणे, आरटीओच्या नियमानुसार कर न भरणे, आदी कारणांनी आरटीओचे मोटर वाहन निरीक्षक कारवाईदरम्यान ऑटोरिक्षा सहित इतर वाहने जप्त करतात.
त्यानंतरही सर्व वाहने आरटीओ कार्यालयाच्या परिसरात ठेवण्यात येतात. मात्र या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या अनेक गाड्यांचे इंजीनसह इतर साहित्य गायब असून वाहनांचे सापळे तेवढे राहिले असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यामध्ये काही रिक्षांचा देखील समावेश आहे.
दरम्यान आरटीओने वर्षभरात ऑटोरिक्षा सहित काही वाहने जप्त केले आहेत. मात्र त्यांना कुणी वाली नसल्याने किंवा किंमतीपेक्षा आरटीओने विविध शीर्षाखाली आकारलेल्या दंडाची रक्कम अधिक असल्याने मूळ मालक प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून हा दंड भरुन नियमानुसार वाहने, रिक्षा सोडवून नेत नाहीत. अनेक वर्षे सदर वाहने पडून राहिल्यास आरटीओ परिवहन विभागाकडून त्यांच्यासह इतर वाहनांचा लिलाव करण्याची परवानगी घेते व सदर वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येतो. मात्र आता केवळ वाहनांचे सांगाडे उरले असल्याने लिलावामध्ये वाहने घेणार कोण असा प्रश्न आरटीओ समोर पडला आहे.