हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियाच्या शास्त्रज्ञांनी मंगळ ग्रहावर 30 दिवसांत पोहोचण्यासाठी एक नवीन इंजिन विकसित केल्याचा दावा केला आहे. या इंजिनाच्या मदतीने, मंगळावर अंतराळवीरांची सोय आणि परत येण्याचा मार्ग अधिक सुलभ होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे मंगळावर मानवाचे आगमन आणि परत येणे शक्य होणार आहे , असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
इंजिनाची सरासरी शक्ती तीन लाख वॉटपर्यंत –
हे इंजिन चुंबकीय प्लाझ्मा त्वरकावर आधारित असून विद्युत ऊर्जेवर कार्यरत आहे. रशियातील ‘रोसाटोम स्टेट न्यूक्लिअर एनर्जी कॉर्पोरेशन’च्या शास्त्रज्ञांनी या इंजिनाचे प्रारूप प्रयोगशाळेत तयार केले आहे. ‘पल्स-पिरिऑडिक मोड’वर कार्यरत असलेल्या या प्लाझ्मा इंजिनाची सरासरी शक्ती तीन लाख वॉटपर्यंत पोहोचते, जे पारंपरिक इंजिनच्या तुलनेत अधिक गती प्रदान करते.
मंगळ ग्रहावर 30 दिवसांत पोहोचण्यासाठी एक नवीन इंजिन –
सध्याच्या पारंपरिक इंजिनांसह मंगळावर पोहोचण्यासाठी एक वर्ष लागतो, मात्र या नव्या इंजिनामुळे मंगळावर पोहोचण्याचा कालावधी 30 ते 60 दिवसांपर्यंत कमी होऊ शकतो, या इंजिनाच्या चाचणीसाठी एक प्रायोगिक सांगाडा तयार करण्यात आला असून, अवकाशातील वातावरणासदृश स्थिती तयार करण्यासाठी एक 14 मीटर लांब आणि 14 मीटर व्यासाची निर्वात जागा तयार केली आहे. यामुळे भविष्यकाळातील मंगळ मोहिमेसाठी मार्गदर्शन मिळेल आणि यानाची उत्पादन क्षमता तपासली जाऊ शकते. मंगळ आणि पृथ्वीच्या अंतरामुळे सध्या अंतराळवीरांचा प्रवास एक वर्षाचा असतो. पण या नवे इंजिन वापरल्यास प्रवासाचा कालावधी कमी होईल आणि मंगळावर अधिक सुरक्षितपणे प्रवास करणारे मानव यथासंभव शक्य होईल.