विशेष प्रतिनिधी । वर्ष २०१३ साली सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण आजही भारतात अनेक घरांमध्ये केवळ सचिन खेळतो म्हणून क्रिकेट पाहणारे चाहते भेटतील. सचिन तेंडुलकरच्या ह्या अशाच चाहत्यांसाठी एक आनंदाची आणि मोठी बातमी आहे.
सचिन तेंडुलकर वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा आणि श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन यांच्यासोबत टी-२० च्या मैदानात उतरणार आहे. आगामी वर्षात रस्ते सुरक्षाविषयक जागतिक स्पर्धेत सचिन दिग्गज खेळाडूंसह मैदानात उतरेल.
या स्पर्धेत भारता व्यतिरीक्त ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या संघाचे माजी खेळाडू खेळताना दिसतील. भारतात २ ते १६ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, विरेंद्र सेहवाग, तिलकरत्ने दिलशान आणि जाँटी ऱ्होड्ससह अनेक दिग्गज माजी क्रिकेटर खेळताना दिसतील. सचिननं आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ एक टी-२० सामना खेळला आहे. ४६ वर्षीय सचिन कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज आहे. २४ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये सचिननं ३४ हजारहून अधिक धावा केल्या आहेत. यात १०० शतकांचा समावेश आहे.