Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणात एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरोपीने मुंबई पोलिसांना चकवून मुंबईबाहेर पळ काढल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी 35 पथकं नेमूनही दोन दिवसांपासून आरोपीला पकडण्यात अपयश आले आहे. विरोधकांनी या प्रकरणाला धार्मिक रंग दिल्याचा आरोप करत, या घटनेला गंभीर वळण दिले आहे. आणि अशातच आरोपी पळवून गेल्याने मुंबई पोलिसांसमोर आरोपीला पकडण्याचे आणखी मोठे आव्हान उभे राहिले आहे.
दादरमध्ये हेडफोन खरेदीचा पुरावा
तपासादरम्यान, आरोपीने दादर रेल्वे स्टेशनजवळील एका दुकानातून 50 रुपयांचा हेडफोन खरेदी केल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे. सैफच्या परिसरातील डेटा डम्प केल्यानंतरही, पोलिसांना दोन दिवसांपासून आरोपीचा ठावठिकाणा लागलेला नाही.
सैफवर प्राणघातक हल्ला (Saif Ali Khan Attack)
आरोपीने वांद्रे येथील सैफ अली खानच्या 12 व्या मजल्यावरील सदनिकेत प्रवेश केला होता. रात्री 2 ते 2.30 दरम्यान, त्याने सैफच्या मुलाच्या बेडरूममधून बाहेर येत पैशांची मागणी केली. यावेळी झालेल्या वादातून त्याने सैफवर सहा वार केले. त्यातील दोन वार घातक ठरले. सैफच्या शरीरातून चाकूचा तुकडा शस्त्रक्रियेनंतर काढण्यात आला आहे.
आरोपी गुजरातकडे
मुंबई पोलिसांनी वांद्रे ते विरारपर्यंतच्या सर्व रेल्वे स्थानकांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. त्यातून आरोपी गुजरातच्या दिशेने निघाल्याचे समोर आले आहे. पोलिसांचे एक पथक आता गुजरातमध्ये पोहोचले असून, महाराष्ट्राबाहेरही आरोपीचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांसमोर आव्हान
पोलिसांनी आरोपीसारखे दिसणाऱ्या काही जणांना ताब्यात घेतले असले, तरी तो अद्याप फरार आहे. मुंबई पोलिसांसाठी आरोपीला पकडणे हे मोठे आव्हान ठरले आहे. सैफ अली खानवरील हल्ल्यामुळे बॉलिवूडसह देशभरात चिंता व्यक्त केली जात असून, आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांच्या प्रयत्नांना यश मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.