महाराष्ट्राची परंपरा जाणणारा सुयोग्य व्यक्ती राज्यपाल म्हणून नियुक्त करावा; संभाजीराजेंची पंतप्रधानांकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी आज ट्विट केले आहे. “भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटविण्यात यावे व महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा,” अशी मागणी ट्विटद्वारे संभाजीराजेंनी राष्ट्रपती व पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.

संभाजीराजेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो अथवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत. त्यामुळे देशाच्या राष्ट्रपती महोदया व पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपण तत्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी ट्विटद्वारे केली आहे.

 

राज्यपाल नेमकं काय म्हणाले?

मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात राज्यपाल कोश्यारी म्हणाले, “कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही,” असे कोश्यारींनी म्हंटले.