नराधम शेजाऱ्याला विकृतीचे वेड, अल्पवयीन मुलीची काढायचा छेड; नंतर केले भयानक कृत्य !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात आता लहान मुलेही सुरक्षित नाहीत, असेच अनेक उदाहरणांवरून दिसून येते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणनगरीजवळील एका गावात अल्पवयीन शालेय मुलीवर जो प्रसंग आला, तो कोणावरही येऊ नये. शेजारच्या एका नराधमाने आपल्या मुलाच्या वयाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार घडल्याची लज्जास्पद घटना घडली आहे. या विकृत नराधमाने पूर्वी दोनवेळा या मुलीची छेडही काढली होती, त्यावेळी गावकऱ्यांनी, तो नराधम सुधारेल म्हणून त्याला समज देऊन सोडून दिले होते. परंतु एकदा विकृती बळावली तर माणूस नीच पातळी गाठतो. तसाच प्रकार घडला.

एका विवाहित इसमाने शेजारी राहणाऱ्या पहिलीच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीची दोनवेळा छेड काढली होती. ग्रामस्थांनी या प्रकरणाची वाच्यता होऊ नये यासाठी सदर इसमाला कडक समज दिली होती. बाळू ज्ञानोबा जाधव असे या विकृताचे नाव असून पिडीत मुलगी दुपारच्या सुट्टीत घरी जात असताना बाळूने मुलीला, तुला खायला पेरू देतो असे आमिष दाखवले. दुपारी शाळेतून घरी जेवण्यासाठी जात असताना या मुलीसोबत तिचा चुलतभाव होता. परंतु बाळूने या मुलीला आमिष दाखवत आपल्या घरात आणले. घरात कोणी नाही असे पाहून मुलीवर अत्याचार केला.

अत्याचार झाल्यानंतर घाबरलेल्या मुलीने दोन दिवसांनी तिच्या आईला हा प्रकार कथन केला. मुलीच्या आईने पैठण पोलीस ठाण्यात नराधम बाळू जाधवविरोधात मुलीवर अत्याचार केल्याची तक्रार नोंदवली. पैठण तालुक्यातील एका गावात हा घृणास्पद प्रकार घडला असून ग्रामस्थ संतापले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बाळू जाधवचा शोध सुरु केला आहे. या गावच्या परिसरात पूर्वी एका अल्पवयीन मुलीवर दोघाजणांनी अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यावेळी परिसरातील लोकांमध्ये संताप व्यक्त होत होता.

विशेष म्हणजे त्या मुलीची दोनवेळा छेड काढल्यानंतर ग्रामस्थांनी नराधम बाळू जाधवला समज देऊनही त्याने या मुलीवर अत्याचार केल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे. पैठण पोलिसांनी त्वरेने घटनास्थळावर जात माहिती घेतली. पण पोलीस गावात येईपर्यंत आरोपी बाळू फरार झाला होता. पैठण पोलिसांनी आरोपी बाळू जाधव विरोधात बलात्कार व बाललैंगिक अत्याचार या कलमाखाली गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिसांनी सुरु केला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी एक पथक नियुक्त केले आहे.