महाविकास आघाडीत ‘स्वराज्य’ पक्ष विलीन करणार? संभाजीराजेंनी स्पष्ट केली भूमिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती याना मोठी ऑफर दिल्याच्या बातम्या आहेत. संभाजीराजेंनी महाविकास आघाडीतील कोणत्याही एका पक्षात प्रवेश केल्यास त्यांना कोल्हापुरातून लोकसभेचे तिकीट दिले जाईल अशा चर्चा सुरु होत्या. मात्र या सर्व बातम्यांवर संभाजीराजेंनी (Sambhajiraje Chhatrapati) आपली भूमिका स्पष्ट करत आगामी वाटचालीबाबत माहिती दिली आहे.

याबाबत संभाजीराजेंनी ट्विट करत म्हंटल, “स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल. या ध्येयाने माझी आणि स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे”, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत. त्यांच्या या ट्विटमुळे ते आता कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाहीत आणि स्वत: स्थापन केलेल्या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातूनच ते आगामी लोकसभा निवडणुकीस सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, कोल्हापुरात लोकसभेच्या २ जागा आहेत. त्यातील एक म्हणजे हातकणंगले आणि दुसरी म्हणजे कोल्हापूर…. सध्या कोल्हापूरचे दोन्ही खासदार धैर्यशिल माने आणि संजय मंडलिक हे शिंदे गटात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडून या दोन्ही नेत्यांना हरवण्यासाठी खास रणनीती आखण्यात येत आहे. त्यासाठी हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांच्यासाठी सोडली जाईल आणि कोल्हापूरच्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाचा विचार महाविकास आघाडीकडून सुरु होता, परंतु आता संभाजीराजेंनी आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही असं म्हंटल आहे. मात्र त्यांचा स्वराज्य पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष होऊ शकतो अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.