समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात; भरधाव ट्रॅव्हल्स ट्रकला धडकली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समृध्दी महामार्गामुळे एकीकडे प्रवासातील वेळेत बचत होऊ लागला असला तरी महामार्ग सुरु झाल्यापासून दररोज अपघाताच्या घटनांमुळे समृद्धी महामार्गाचे नाव खराब झालं आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या बुलढाणा बस अपघाताची घटना अजूनही ताजी असतानाच आता समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर शहराजवळील सावंगी परिसरात ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात २० जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, खुराणा ट्रॅव्हल्सची बस प्रवाशांसह संभाजीनगर मार्गावरुन निघाली असता तिने लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबर होती की, बसच्या कॅबिनचा चक्काचूर झाला. यामध्ये २० प्रवाशी जखमी झाले आहेत. यानंतर अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील सर्व प्रवाश्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. तसेच सर्व जखमी प्रवाश्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले गेले. सध्या पोलीस या सर्व घटनेचा तपास करीत आहेत.

या भीषण अपघातामुळे दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच प्रवाश्यांच्या मनात देखील या महामार्गाविषयी भिती निर्माण झाली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच समृध्दी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हलच्या अपघातात तब्बल २५ प्रवाश्यांना आपला जीव गमवावा लागला होता. आता ही घटना ताजी असतानाच आणखीन एक अपघात याच महामार्गावर घडला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग हा अपघातांचा मार्ग बनत आहे का अशी भीती निर्माण झाली आहे. महामार्गावरुन सतत येणार्या अपघातांच्या घटनांमुळे हा महामार्ग जीवघेणा ठरत असल्याची टीका राजकिय नेत्यांकडून केली जात आहे. तसेच हे अपघात रोखण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्यात याव्यात या मागणीने देखील जोर धरला आहे.