सांगली लोकसभा मतदार संघावरून आघाडीत कुस्ती; विशाल पाटील बंड करणार??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीमध्ये ज्या काही मोजक्या जागांवरून वाद सुरु आहे, त्यातीलच एक जागा म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha 2024) … कोल्हापूरची आपली हक्काची जागा शाहू महाराजांसाठी काँग्रेसला सोडल्यानंतर ठाकरे गटाने त्याबदल्यात सांगलीची जागा आपल्याकडे घेतली आणि एवढच नव्हे तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) याना उमेदवारीही जाहीर केली. यानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झालाय. सांगली हि काँग्रेसची पारंपारिक जागा असून याठिकाणी पुन्हा एकदा विशाल पाटील (Vishal Patil) लढतील असं काँग्रेस नेते विश्वजित कदम ठासून सांगत आहेत. त्यामुळे काँग्रेसपुढे उद्धव ठाकरे माघार घेणार कि विशाल पाटील खासदार होण्यासाठी बंड करणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष्य आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सांगली जिल्हा 2014 च्या मोदी लाटेत पहिल्यांदाच उधवस्त झाला. भाजपचे उमेदवार संजय काका पाटील तब्बल सव्वा दोन लाख मतांनी विजयी झाले. त्यावेळी त्यांनी तत्कालिन केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांचा पराभव केला. आणि सांगलीत काही प्रमाणात काँग्रेसी विचार बॅकफुटला फेकला गेला. सांगली, पळूस-कडेगाव, खानापूर, तासगाव – कवठे- महंकाळ, जत अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा सांगली लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. 1967 झाली झालेल्या पहिल्या निवडणुकीत सांगलीतून काँग्रेसचे तिकिटावर एस.डी. पाटील पहिल्यांदा निवडून आले. यानंतर शालिनीताई पाटील, स्वतः वसंत दादा पाटील, प्रकाश बापू पाटील तब्बल पाच वेळा, मदन पाटील दोनदा, तर प्रकाश बापू पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील 2006 च्या पोटनिवडणुकीत आणि 2009 ला दोनदा निवडून आले. याचाच अर्थ वसंतदादा पाटील यांच्या घरातच सांगलीची खासदारकी तब्बल 40 वर्षे राहिली.

काँग्रेसचे Vishal Patil अपक्ष लढत डबल महाराष्ट्र केसरी पैलवानाला चितपट करणार? Chandrahar Patil

त्यामुळे साहजिकच 2014 च्या निवडणुकीतही काँग्रेसकडून प्रस्थापित असलेल्या वसंत दादा पाटील यांच्या घरातीलच प्रतीक पाटील यांना पुन्हा एकदा खासदारकीचं तिकीट दिलं. त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या अवघ्या काही दिवसातच राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेल्या संजय काका पाटील यांना संधी देण्यात आली. देशभरात मोदींची लाट असली तरी याचा सांगलीत काहीच इम्पॅक्ट होणार नाही असं वाटल्यानं काँग्रेस आणि पाटील घराणं निर्धास्त होतं. निकाल आला…आणि पहिल्यांदाच सांगलीच्या इतिहासात बिगर काँग्रेसी खासदार निवडून आला. काँग्रेसच्या बालेकिल्लाला तडे जाऊन इथे भाजपने पाय घट्ट रोवले होते.

संजय काका पाटील पहिल्याच निवडणुकीत इतिहास घडवून कमळाच्या चिन्हावर दिल्लीत गेले. अर्थात प्रतीक पाटलांसाठी हा पराभव जिव्हारी लागणारा होता. आधीचा निकाल सगळ्यांसाठी धक्कादायक असल्याने 2019 ची निवडणुकही महत्त्वाची ठरली. मात्र ही निवडणूक तिहेरी ठरली आणि सांगलीच्या राजकारणात आणखीनच रंगत आणली. यावेळेस झालं असं की आघाडी कडूनही जागा काँग्रेसला सुटली खरी पण वसंतदादांच्या घरातून नेमकं कोण निवडणुकीच्या मैदानात उतरणार? याचा निर्णय काही लवकर झाला नाही… त्यामुळे काँग्रेस हायकमांडचा भ्रम निरास झाल्यामुळे ही जागा मोक्याच्या टायमिंगला स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडावी लागली. मात्र राजू शेट्टी यांनीही काँग्रेसकडून विशाल पाटील यांची उसनवारी करून त्यांना शिट्टी या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरवलं.वंचित बहुजन आघाडी कडूनही गोपीचंद पडळकर यांना तिकीट देण्यात आलं होतं. मात्र मोदी लाटेत भाजपच्या संजय काका पाटील यांना पुन्हा ताकद मिळाली आणि त्यांनी तब्बल 5 लाख 8 हजार 995 मतं मिळवत दणदणीत विजय मिळवला. यावेळेस विशाल पाटील यांना 3 लाख 44 हजार 643 आणि गोपीचंद पडळकर यांनी 3 लाख 234 मतं मिळवत विशाल पाटील यांच्या विजयाच्या मार्गातला अडथळा ठरत संजय काकांना अप्रत्यक्ष मदत केली होती असं म्हणत तरी चुकीचे ठरणार नाही.

जिल्ह्यात सध्या काँग्रेसचे नेतृत्व विश्वजित कदम यांच्याकडे आहे. विशाल पाटील यांनी विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे सांगत पतंगराव कदम आणि वसंतदादा घराण्यातील वाद थांबवला आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत वादाला आता सामोपचाराची किनार असल्याने आणि राष्ट्रवादी आणि ठाकरे गटही सोबत असल्याने प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यंदा काँग्रेसकडून काही केल्या निवडणुकीचं फुल टू मैदान मारण्यासाठी उतरतील असं बोलले जात असताना उमेदवारी मध्ये ट्विस्ट आणला तो चंद्रहार पाटलांनी…शिवसेनेने मध्येच सांगलीत उडी घेत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना सांगलीची उमेदवारी जाहीर देखील केली…सुरुवातीला हा महाविकास आघाडी कडून एकदिलाने निर्णय घेतला असल्याचं वाटत होतं…कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असं काहीसं गणित यासाठी मांडला जात होतं…मात्र कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा कोणताही प्रस्ताव काँग्रेसकडे नाही…हा महाविकास आघाडीचा नसून शिवसेनेचा वैयक्तिक उमेदवार आहे…असं म्हणत विश्वजीत कदमांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली…अर्थात त्यांच्यासोबत विशाल पाटील देखील होतेच…म्हणजेच काय यंदा काही केल्या आपण निवडणूक लढणारच अशा तयारीत असलेल्या विशाल पाटलांनी काँग्रेसकडून मिळालं तर ठीक नाहीतर अपक्षही मैदान मारायचं ठरवलय…त्यामुळे आता सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळतंय…

विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत विशाल पाटील यांना निवडणूक चिन्हाचा फटका बसलाच पण त्याहून जास्त फटका बसला तो वंचित बहुजन आघाडीचा…जवळपास विशाल पाटील यांच्या इतकीच मतं वंचितला मिळाल्याने भाजपच्या संजय काका पाटील यांच्या विजयातला अडथळा नकळत दूर झाला होता…दुसरीकडे, भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्यावर मात्र त्यांच्याच पक्षातील आमदार आणि भाजप नेते देखील नाराज होते. मात्र भाजपाने पुन्हा एकदा संजय काका पाटलांवरच विश्वास टाकला…आणि सलग तिसऱ्यांदा त्यांना सांगलीची उमेदवारी देऊ केली…अनेक राजकीय विश्लेषक संजय काका पाटील यांना अँटी इन्कमबन्सीचा फटका बसणार असं म्हणतायत कारण सांगलीतील विमानतळासाठी पाठपुरवठा काही झाला नाही, आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे हळद संशोधन केंद्र. हळद ही सांगलीची ओळख पण असं असुनही हे केंद्र हिंगोलीला गेलं. आणि हे एकप्रकारे केंद्रात पक्षाची सत्ता असूनही विद्यमान खासदारांचे अपयश मानले जाते. त्यामुळे आता विशाल पाटील बंड करणार का? संजय काका पाटील विजयाची हॅट्रिक मारणार का मारणार का? की चंद्रहार पाटील कुस्तीच्या मैदानातून शिवसेनेला सांगलीत बस्तान बांधून देणार? हे येत्या काळात पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे…