Sangli News : रागाने बघितलं म्हणून तरुणाचा निर्घृण खून; महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा राडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली (Sangli News) : सांगलीत एखादा खून कशा कारणाने होईल हे आता काही सांगता येत नाही. केवळ रागाने बघितल्याच्या कारणातून एका महाविद्यालयीन तरुणाला आपला भर रस्त्यात जीव गमवावा लागलाय. महाविद्यालयीन तरूणावर धारधार शस्त्राने हल्ला चढवत निर्घृण खून करण्यात आला. राजवर्धन रामा पाटील (वय १८, रा. मतकुणकी, ता. तासगाव) असे त्या तरूणाचे नाव आहे. वसंतदादा साखर कारखाना परिसरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, संशयित तीन हल्लेखोरांना पोलिसांनी रात्री उशीरा ताब्यात घेतले आहे. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत पोलिसांकडू मिळालेली माहिती अशी, की मृत राजवर्धन हा सांगलीतील आयटीआयमध्ये शिक्षण घेतो. तो मूळचा तासगाव तालुक्यातील मतकुणकी येथील रहिवासी आहे. तो शिक्षणानिमित्त बुधगाव येथील नातेवाईकांकडे राहत होता. महाविद्यालय सुटल्यानंतर तो मित्रांसह कारखाना परिसरातून नित्याने जायचा. कारखाना एसटी थांब्यावर तो दररोज बसने घरी जात होता. संशयित हल्लेखोर आणि राजवर्धन यांच्या दोन दिवसांपासून एकमेकांकडे बघण्यावरून राग होता.

दरम्यान, राजवर्धन आज नेहमीप्रमाणे महाविद्यालयात आला होता. त्यानंतर सायंकाळी साडेपाच्या सुमारास औद्योगिक वसाहतीतून कारखान्यात त्याने प्रवेश केला. त्यावेळी त्याचा मित्रही सोबत होता. संशयित हल्लोखोर आणि राजवर्धन यांच्या पुन्हा एकमेकांकडे बघण्यावरून राग निर्माण झाला. राग टोकाला गेल्यानंतर हल्लेखोरांनी राजवर्धन यास कारखाना प्रवेशद्वाराजवळ गाठले. जोरदार वादावादी करत धारधार हत्याराने राजवर्धन याच्या मानेवर आणि छातीवर वर्मी वार केले. राजवर्धन हा रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. (Sangli News)

घटनेनंतर परिसरातील नागरीकांनी मोठी गर्दी केली. राजवर्धन यास गंभीर जखमी अवस्थेत तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैव असे की उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. संजयनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संजय क्षीरसागर, शहरचे निरीक्षक अभिजीत देशमुख, उपनिरीक्षक महेश डोंगरे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी पंचनामा करून रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे हलवत रात्री उशीरा तिघा संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतल्याचे समजते आहे.