मिरज ते खानापूर… सांगलीत विधानसभेला निकालाचं कसं कसं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीला सांगली महाराष्ट्राच्या चर्चेचा सेंटर पॉईंट ठरला… त्याला कारण ठरलं ते म्हणजे विशाल पाटलांची अपक्ष उमेदवारी… महाविकास आघाडीत तिकीट न मिळाल्यानं विशाल पाटलांनी शेवटी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला… आणि निवडणूक जिंकली देखील… शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांना चितपट करत मैदान मारलं ते विशाल पाटलांनीच… ठाकरेंच्या उमेदवाराचं इथून डिपॉझिट जप्त झालं…तर भाजपच्या दोन टर्म खासदाराचा सांगलीत दारुण पराभव झाला…या निकालानं एक गोष्ट सिद्ध झाली ती म्हणजे सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि यापुढेही राहील…लोकसभेचा हा सगळा धुराळा पार पडल्यानंतर आता वेळ आलीये ती विधानसभेची… त्यामुळे मिरज पासून ते तासगाव कवठेमहाकाळपर्यंत सांगली जिल्ह्यात आमदार म्हणून जनता कुणाला कौल देतेय? जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात विधानसभेचं गणित नेमकं कसं कसं राहील? त्याचं केलेलं हे सविस्तर विश्लेषण…

सांगलीतला पहिला विधानसभा मतदारसंघ येतो तो पलूस कडेगावचा…

काँग्रेसच्या विश्वजीत कदमांचा हा अभेद्य बालेकिल्ला… संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण हलवणाऱ्या कदमांना पलूस कडेगावची जनता आरामात आमदारकीला निवडून देते… पतंगराव कदमांनी भक्कम बांधणी केलेल्या पलूस कडेगावमध्ये आजही विश्वजीत कदमांवर जनता भरभरून प्रेम करते…मावळत्या विधानसभेला शिवसेनेच्या संजय विभुते यांनी विश्वजीत कदमांच्या विरोधात मैदानात उतरण्याची हिम्मत दाखवली. पण प्रत्यक्ष निकालात विभूतेंपेक्षा नोटाला मत जास्त मिळाल्याने विश्वजीत कदमांचा विजय वन साईट ठरला…. मागच्या पाच वर्षांपासून भाजपचं केडर मतदार संघात स्ट्रॉंग झालं आहे…भाजपकडून यंदा आमदारकीला पृथ्वीराज देशमुख, संग्राम देशमुख यांची नावं चर्चेत असली तरी विश्वजीत कदमांचा 2024 चा गुलालही फिक्स समजला जातोय…

YouTube video player

दुसरा मतदारसंघ आहे इस्लामपूर विधानसभेचा…

इस्लामपुरात वन मॅन शो जयंत पाटलांचं राजकारण चालतं… 1990 पासून तब्बल तीन दशकं ते या मतदारसंघाचं निर्विवाद प्रतिनिधित्व करत आले आहेत…मात्र नगरपालिकेतील राष्ट्रवादीची तीस वर्षांची सत्ता भाजपने संपुष्टात आणली.. हा पाटलांसाठी मोठा धक्का होता…त्यासोबतच अजित पवार गटापासून ते स्वाभिमानी पर्यंत प्रत्येक पक्ष या मतदारसंघावर लक्ष ठेवून आहे… पण असं असलं तरी इस्लामपुरात जयंत पाटील यांचंच पारड सध्या तरी जड दिसतय… विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी इस्लामपूर संदर्भात केलेली काही सूचक वक्तव्य पाहता इथे काही बिग गेम पाहायला मिळणार का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच…

तिसरा मतदार संघ आहे तासगाव कवठेमहाकाळचा…

आर. आर. आबा यांच्या पत्नी सुमनताई पाटील इथल्या विद्यमान आमदार.. २०१९ ला त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी… शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेल्या या पाटील घरण्याकडून सध्या रोहित पाटील यांना उमेदवारी मिळण्याचे फुल चान्सेस आहेत… नगरपंचायतीतील विजयापासूनच रोहित पाटील य़ांचं नेतृत्व मतदारसंघात प्रस्थापीत झालय… आमदारकीसाठी त्यांनी मागील काही वर्षांपासून मतदार संघात चांगलाच जम बसवलाय…त्यांच्या विरोधात महायुतीकडून संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील निवडणूक लढवण्याची शक्यता आहे…त्यासाठी संजय काकांनी आत्तापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केल्याचेही बोललं जातंय… अजित घोरपडे सरकार यांसारखे पारंपारिक विरोधक मतदार संघात असले तरी तासगावात यंग ब्रिगेड मध्ये आमदारकीसाठी लढत होऊन रोहित पाटील यांच्या विजयाचे चान्सेस सध्या जास्त आहेत…

चौथा मतदारसंघ आहे मिरजचा…

भाजपचे सुरेश खाडे इथले विद्यमान आमदार. अबकी बार एक लाख पार’ म्हणत त्यांनी 2019 ची निवडणूक लढवली… आपण ठरवलं तसं झालं नसलं तरी मिरजमध्ये आमदारकीची हॅट्रिक त्यांनी मारली… त्यामुळे भाजपची पाळंमुळं चांगलीच घट्ट रोवली गेली… मात्र प्रतिस्पर्धी लढत दिलेल्या स्वाभिमानीच्या बाळासाहेब होनमोरे यांनीही चांगली मतं घेतल्याने येणाऱ्या विधानसभेला विरोधकही इथून स्ट्रॉंग पोझिशनला आहेत… मुस्लिम आणि दलित समाजाची भाजपच्या विरोधात गेलेली मत पाहता येणाऱ्या विधानसभेला मिरजची लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे…

पाचवा मतदार संघ येतो तो सांगलीचा…

भाजपचे सुधीर गाडगीळ सांगली विधानसभेचे विद्यमान आमदार…मागील दोन टर्म त्यांनी सांगलीवर होल्ड मिळवला असला तरी लोकसभेच्या निकालामुळे आणि त्यांच्या विरोधातील अँटी इनकंबनसीचा काँग्रेसच्या उमेदवाराला फायदा मिळण्याची शक्यता जास्त आहे…पृथ्वीराज पाटील, जयश्री मदन पाटील यांसारख्या उमेदवारांची नावे यंदा महाविकास आघाडी कडून चर्चेत असून काँग्रेसच्या विजयाचे चान्सेस सांगली विधानसभेत वाढलेले आहेत…

सहावा मतदारसंघ आहे शिराळा विधानसभा…

सांगली जिल्ह्याचा डोंगरी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिराळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत शरद पवार गटाचे मानसिंग नाईक… मतदार संघातील कामांची पोचपावती यामुळे शिराळ्यात त्यांच्या नावाची हक्काची वोट बँक आहे… डोंगरी भागात केलेली विकासकामं आणि मतदारांसाठी धावून जाणारं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख… तसं पाहिला गेला तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी महायुतीच्या सर्वच पक्षांची तयारी आहे…. शिवाजी नाईक, भाजपचे सत्यजित देशमुख यांच्या नावाची सध्या विधानसभेसाठी चर्चा आहे… त्यामुळे मानसिंग नाईक विरुद्ध सत्यजित देशमुख असा संघर्ष शिराळ्यात पाहायला मिळू शकतो…

सातवा मतदारसंघ आहे जत विधानसभेचा…

गतवर्षीच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे विक्रमसिंह सावंत यांनी भाजपचे आमदार विलासराव जगताप यांचा दारुण पराभव करत काँग्रेसला मतदारसंघात पुन्हा नवसंजीवनी मिळवून दिली होती… विक्रमसिंह सावंत यांना 87 हजार 184 मते तर विलासराव जगताप यांना 52 हजार 510 मते मिळाली होती…तसं पाहायला गेलं तर विक्रमसिंह सावंत हे विश्वजीत कदम यांचे जवळचे समजले जातात… त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीतही सावंतांना कदमांच्या नेटवर्कचं बळ मिळू शकतं…त्यात विलासराव जगताप यांनी लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात उघडपणे काम केल्यामुळे त्यांना यंदा तिकीट मिळण्याची शक्यता नसल्यातच जमा आहे… बाकी महायुतीतर्फे गोपीचंद पडळकर यांच्या नावाची या मतदारसंघासाठी चर्चा आहे…त्यामुळे उमेदवारी मिळाल्यानंतरच इथलं चित्र क्लियर होणार असला तरी सध्या काँग्रेस जतमध्ये स्ट्रॉंग पोझिशनला आहे…

आठवा आणि शेवटचा मतदारसंघ आहे खानापूर विधानसभेचा…

विद्यमान आमदार अनिल बाबर यांच्या निधनानंतर हा मतदारसंघ तसा गुंतागुंतीचा राहिला आहे… शिवसेना शिंदे गटात असणारे अनिल बाबर हे आधी राष्ट्रवादीत होते… खानापुरात त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे त्यांच्याविषयी जनतेच्या मनात नक्कीच सहानुभूती असेल…त्यामुळे त्यांचे चिरंजीव सुहास बाबर हे शिवसेना शिंदे गटाकडून सध्या विधानसभेची तयारी देखील करत आहेत…जर त्यांना तिकीट मिळालं तर इमोशनल फॅक्टर खानापूरच्या विधानसभेला महत्त्वाचा ठरू शकतो… दुसरीकडे अजित पवार गटातील सदाशिव पाटील किंवा वैभव पाटील हे निवडणुकीपूर्वी तुतारी हातात घेऊन शिंदे गटाच्या उमेदवाराला आव्हान देऊ शकतात… तर असा आहे सांगली विधानसभेचा हा निवडणुकीपूर्व आढावा… सद्यस्थितीत जिल्ह्यात महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे… त्यात लोकसभेला भाजपच्या दोन टर्मच्या आमदाराला पाय उतार व्हायला लागल्याने महाविकास आघाडीला सध्या इथून अप्पर हॅण्ड आहे…एवढं मात्र नक्की…बाकी सांगली विधानसभेला आमदारांचं कसं कसं असेल? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…