काय झाडी… फेम शहाजीबापूंची सांगोला विधानसभेची आमदारकी हातातून जातेय??

shahaji patil sangola
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काय झाडी…काय डोंगर… काय हॉटेल… हा फक्त काही डायलॉग नव्हता तर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचं हे होतं जळजळीत वास्तव… कधीच कुठे फारसं चर्चेत नसलेलं शहाजी बापू पाटील (Shahaji Patil) हे नाव याच डायलॉगमुळे उभ्या महाराष्ट्राला माहित झालं…पण हे शहाजी बापू ज्या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले तो मतदारसंघ वेगळ्याच राजकीय चेहऱ्यासाठी ओळखला जातो…होय, आम्ही बोलतोय सांगोला विधानसभा मतदारसंघाबद्दल…आम्ही बोलतोय तब्बल 11 टर्म, पन्नास वर्ष, एकाच पक्षातून विधानसभेवर निवडून जाणाऱ्या गणपतराव देशमुखांबद्धल… 1995 चा अपवाद वगळता 1972 पासून ते सलग अकरा वेळा निवडून आले… अतिशय साधी राहणी, सर्वसामान्यांच्यात मिसळणार नेतृत्व आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाड्यावस्त्यांवर पसरलेलं कार्यकर्त्यांचं नेटवर्क यामुळे शेकापचा लाल झेंडा कायमच इथे फडकत राहिला… एसटीने प्रवास करणारा आमदार म्हणून त्यांचा वायरल फोटो आपण कधी ना कधी पाहिला असेलच…पण याच अजातशत्रू गणपतरावांनी वयाचं कारण समोर करत २०१९ च्या निवडणुकीतून माघार घेत नातू अनिकेत देशमुखला निवडणुक रिंगणात उतरवलं… पण चेहरा बदलल्यामुळे सांगोल्याचं राजकारण फिरलं आणि देशमुखांचे कट्टर प्रतिस्पर्धी समजले जाणारे शहाजी बापू पाटील यांनी मतदारसंघात आमदारकीचा भगवा फडकवला…

पण शिवसेनेच्या फुटीला सपोर्ट करणं… गुहावटीमध्ये डायलॉगबाजीमुळे फेमस होणं… शिंदे गटासाठी वायरल भाषण करणं एवढंच नाही तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीला डायरेक्ट मोहिते पाटलांना शिंगावर घेण्याची धमक दाखवण… हा सगळा गेलाबाजार राजकीय इतिहास पाहता शहाजीबापूंना सांगोल्याची जनता पुन्हा निवडून देईल का? आजोबांचा वारसा पुढे चालवत अनिकेत देशमुख यंदा शेकापचा गुलाल कुणा मतदारसंघात उधळणार का? सांगोल्यात आमदारकीला शिवसेना की शेकाप? याचंच केलेलं हे पॉलिटिकल डिकोडिंग…

गणपतराव देशमुख…पक्ष शेकाप…मतदारसंघ सांगोला…तब्बल 11 टर्म अजिंक्य आमदार म्हणून त्यांची ओळख… जसा गणपतरावांचा आमदारकीचा विक्रम आहे, तसा विक्रम माझा पराभवाचा आहे…असं दिलदारपणे कबूल करणारे गणपतरावांचे विरोधक म्हणजे शहाजी बापू पाटील…1995 सालीही याच शहाजीबापूंनी पहिल्यांदा गणपतरावांना पराभवाचा दणका दिला…पण आपला हा विजय त्यांना पुढे कंटिन्यू करता आला नाही…शहाजी बापू प्रत्येक निवडणुकीत पराभूत व्हायचे… पण जिद्द आणि चिकाटी कायम ठेवून ते प्रत्येक वेळेस विरोधात उमेदवारी द्यायचेच… पण त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना 2019 च्या आमदारकीला सुवर्णसंधी चालून आली… कारण वयाचं कारण पुढे करत गणपतरावांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला…त्यांनी माघार घेऊनही आबासाहेबच फिरसे! अशा घोषणा सांगोल्या दिल्या जाऊ लागल्या… यावरून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांची मनस्थिती आपल्या लक्षात येऊ शकते…

त्यानंतर शेकापने सांगोल्यातून भाऊसाहेब रुपनवरांना उमेदवारी जाहीर केली. मात्र अचानकच हा निर्णय पलटी करत गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुखांना उमेदवारी जाहीर करण्यात आली… नाराज झालेल्या रुपनवरांनी शिवसेनेची वाट धरली… राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखेही शिवसेनेत गेले… त्यामुळे निवडणुकीपूर्वीच शहाजीबापूंची ताकद चांगलीच वाढली होती… त्यात फडणवीसांसोबत त्यांनी जमवलेली गट्टी बघता विजयाचं मार्जिन खेचून आणण्यात जे अंतर कमी पडत होतं, तो गॅप या सर्वांच्या बॅकअप मुळे यंदा भरून निघणार होता…मात्र अनिकेत देशमुखांच्या पाठीशी असणारी आजोबांची साथ, सहानुभूतीच वारं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संघटनेचा कनेक्ट अनिकेत देशमुखांच्या पाठीशी होताच…

निवडणूक झाली… निकाल लागला… आणि आश्चर्यकारकरीत्या अवघ्या 674 मतांच्या लीडने शहाजीबापूंनी शिवसेनेचा भगवा झेंडा सांगोल्यात फडकवलाच… शिवसेना भाजपची युती, शेकाप मधील इच्छुक नाराज कार्यकर्ते आणि घराणेशाहीचा झालेला आरोप या सगळ्या गोष्टी अनिकेत देशमुखांना मायनस मध्ये घेऊन गेल्या… आणि शहाजी बापू जायंट किलर ठरत आमदार झाले… पण त्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली ती गुवाहाटीच्या डायलॉग बाजी मुळे… त्यामुळे कधीतरी कानावर पडलेलं शहाजीबापूंचं नाव महाराष्ट्राला माहित झालं… शिंदे गटाच्या अनेक जाहीर सभांमध्ये त्यांची भाषण गाजू लागली, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीला तर शहाजी बापूंनी विरोधाची हाईप केली…महायुतीच्या प्रचारात थेट मोहिते पाटलांना शिंगावर घेण्याची हिम्मत त्यांनी दाखवली..अकलूजला रावण जन्मला आणि आमच्या उरावर बसला…आता परत त्याला जन्माला घालू नका… इथपासून ते मोहिते पाटील माझ्या डोक्यात गेले आहेत… अशा शब्दात त्यांना पाडायची भाषा शहाजी बापूंनी केली… आता त्यांच्या सांगोल्यातच मोहिते पाटलांना चिखली मिळालं, तो भाग वेगळा… पण मागच्या एक ते दोन वर्षात शहाजी बापूंनी आपले अनेक स्थानिक नेत्यांना विरोधात घालवलय…

बायकोची शपथ घेऊन सांगतो, गणपतरावांना पाडायचं नव्हतं, तालुक्याला पाणी आणि विकास आणायचा होता, म्हणून निवडणूक लढवली, अशा शपथा खाणाऱ्या शहाजी बापूंनीही मतदार संघातील पाण्याचा प्रश्न कितपत सोडवला? हा संशोधनाचा विषय होऊ शकतो…मतदारसंघात तुरळक कामं झाली पण त्यांना विशेष वगैरे म्हणता येणार नाही…त्यात शिवसेना फुटीपासूनच्या सगळ्या काळामध्ये शहाजी बापूंची क्रेझ वाढली असली तरी त्यांची इमेज डाऊन झाली आहे… मतदारसंघातील सच्चा शिवसैनिकांचा कनेक्टही त्यांच्यापासून लांब गेलाय… त्यात मोहिते पाटील लोकसभेचा वचपा विधानसभेला काढणार हे फिक्स असल्यामुळे महायुतीचे उमेदवार असूनही शहाजी बापू चहूबाजूंनी कोंडीत सापडले आहेत… दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाचे माजी आमदार दीपक आबा सोळंके देखील विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत…शेकाप बद्दल बोलायचं झालं तर अनिकेत देशमुख आणि त्यांचे काका बाबासाहेब देशमुख यांच्यातही तिकीट कुणाला मिळणार? यासाठी संघर्ष पाहायला मिळू शकतो… पण सध्यातरी शेकापचं पारडं सांगोल्यात जड दिसतंय…शेतकरी कामगार पक्षाचा तालुक्यावरील कंट्रोल तसंच धनगर समाजाचं एकगठ्ठा मतदान नेहमीच देशमुखांच्या पाठीशी राहिलं…त्यामुळे अनिकेत देशमुख यंदा उमेदवार असतील तर हा समाज विजयाचं निर्णायक मतदान शेकापच्या पारड्यात टाकू शकतो, असं चित्र सध्या तरी पाहायला मिळतय…

ही सगळी जरी वस्तुस्थिती असली तरी मतदारसंघातला मोठा भाग आजही दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. एमआयडीसी नाही ना तरुणांच्या हाताला रोजगार..,टेंभू योजनेच्या पाण्याची वाट पाहता पाहता मतदारसंघातील जनतेच्या घशाला कोरड पडली… हे सगळंच शेकापच्या आणि देशमुख कुटूंबाच्या राजकारणावर भलंमोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करतं.. त्यामुळे अनिकेत देशमुख यांना याचा काहीसा का होईना फटका बसण्याची दाट शक्यता आहे… त्यामुळे सांगोल्याचा आमदार कोण होईल, तो होईल… पण मतदारसंघातील समस्यांकडे हे आमदारजीवी लोक खरंच सिरीयसली बघणार आहेत का, हा मुख्य प्रश्न आहे…सांगोल्यात शहाजीबापू पुन्हा एकदा आमदारकी जिंकत सगळं ओक्के करुन टाकतील, की अनिकेत देशमुख शेकापचा वारसा पुढे चालवण्यासाठी यंदा गुलाल लावतायत, तुम्हाला काय वाटतं, सांगोल्याचा पुढचा आमदार कोण, ते आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा…