हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संग्राम थोपटे (Sangram Thopate) … हे नुसतं नाव नाहीये… तर हा आहे भोरच्या राजकारणाचा हुकुमी एक्का… आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालू ठेवत 2009 पासून सलग तीन टर्म संग्राम थोपटे फक्त आमदार झाले नाहीत तर त्यांनी आपल्या मतदारसंघात विरोधकांना नावाला देखील शिल्लक ठेवलं नाही… भाजप, शिवसेनेनं अनेकदा प्रयत्न करुनही काँग्रेसी विचाराला जागले..नेहमी एकनिष्ठ राहीले.. भोर मतदारसंघात यंदा हायलाईटमध्ये राहीला कारण शरद पवार, अजित पवार आणि विजयबापू शिवतारे यांनी थोपटेंच्या घरी जाऊन अनंतरावांच्या घेतलेल्या भेटींमुळे… बारामतीच्या लोकसभेचा निकाल पाहीला तर लगेच लक्षात येत की सुप्रियाताईंच्या विजयात भोरचा मोठा वाटा राहीलाय… थोडक्यात थोपटे यांनी एकदा शब्द दिला की तो तडीस नेल्याशिवाय जनता राहत नाही.. असा इथला एकूणच प्रकार आहे.. पण हे सगळं पाहील्यावर एक प्रश्न पडतो की थोपटे या नावात अशी नेमकी कोणती जादू आहे? की त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय भोरच्या राजकारणाचं पानही हालत नाही… भाजप आणि शिवसेनेसारख्या सत्तेतल्या पक्षांनी प्रयत्न करुनही मतदार थोपटेंनर डोळेझाकून विश्वास कसा ठेवतात… सर्वात महत्वाचं म्हणजे सलग तीन टर्म आमदार राहीलेले संग्राम थोपटे या निवडणुकीत विजयाचा चौकार मारतील का? भोर – वेल्हा – मुळशी या विधानसभा मतदारसंघात नेमकं काय घडू शकतं.. या सगळ्याचीच ही इनसाईड स्टोरी..
सुरवात करुयात एका किस्स्यापासून..१९९५ च्या आसपास पुण्यात शरद पवारांना समांतर असं काँग्रेसमधून एक सत्ताकेंद्र तयार होत होतं.. ते नावं म्हणजे भोर विधानसभेचे अनंतराव थोपटे.. थोपटे काँग्रेसमधील पहील्या फळीतील नेते.. २००४ ला थोपटे यांची पक्षातील पत इतकी वाढली होती की तेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील, हे कन्फर्म समजलं जात होतं.. पण राजकारणात पडद्याआडून असं काही घडलं की ज्या थोपटेंशिवाय देशमुखांचं पानही हालत नव्हतं त्या विलासराव देशमुखांना मुख्यमंत्री करण्यात आलं.. थोडक्यात अनंतराव थोपटेंचा पत्ता कट करण्यात आला… १९९९ च्या निवडणुकीत तर थोपटेंना पराभवाचा धक्का बसला.. अर्थात या सगळ्या प्रकरणात पडद्याआडून राजकीय सोंगट्या चालवण्याचा प्रकार सुरु होता तो कार्यक्रम शरद पवार पार पाडत असल्याची चर्चा होती..
थोडक्यात एकाच जिल्ह्यात असूनही… एकाच पक्षात सुरुवातीचं राजकारण गिरवूवही… पवार आणि थोपटे यांच्यात हाडवैर तयार झालं ते कायमचंच… यानंतर थोपटेंनी आपल्या सुपुत्राला २००९ ला राजकारणात उतरवलं.. तेव्हापासून झालेल्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीत संग्राम थोपटे काँग्रेसचा झेंडा घेऊन निवडणुक लढवत गेले.. आणि जिंकतदेखील… 2009 ला शिवसेनेच्या शरद ढमालेंचा तर 2014 आणि 2019 अशा सलग दोन टर्म शिवसेनेच्या कुलदीप कोंडे यांना अस्मान दाखवत संग्राम थोपटे वन साईड निवडणूक जिंकत आले… महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर संग्राम थोपटे यांचं मंत्रीपद कन्फर्म समजलं जात होतं… मात्र त्याही वेळेस त्यांच्या नावाला कात्री लावण्यात आली… अर्थात हे सगळं पवारांकडून सुरू असल्याच्या वावड्याही तेव्हा बऱ्याच उठल्या होत्या…पण पक्षफुटी नंतर शिवसेनेची ही ताकद कमी झाल्यामुळे संग्राम थोपटे आजही मतदारसंघात वन मॅन शो असल्यासारखे आहेत…
पुण्याला अगदी लागून असणाऱ्या या मतदारसंघ तसा जास्त फोकसमध्ये येतो तो लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान… बारामती मतदारसंघात मोडणारा हा भोर विधानसभा मतदारसंघ नेहमीच आघाडीच्या बाजूने निर्णायक मताधिक्य टाकत आलाय… थोडक्यात बारामती हा पवारांचा बालेकिल्ला असला तरी त्याच्या चाव्या या भोरमुळे थोपटेंच्या हातात असतात…राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जेव्हा लोकसभेचं बिगुल वाजलं तेव्हा गेला बाजार इतिहास विसरून शरद पवार, अजित पवार, विजयबापू… यांना स्वतः मदतीसाठी थोपटेंच्या घराच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या… यावरून भोरमध्ये थोपटे नावाचा ब्रँड किती मोठा आहे, याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो… नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत संग्राम थोपटेंनी तब्बल 43 हजारांचं लीड तुतारीच्या पाठीशी दिलं… हाच आकडा गृहीत धरला तर संग्राम थोपटे यंदाही आरामात आमदार होतायत, असं म्हणल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही…
पण काँग्रेसमधील अनेक प्रस्थापितांचे बालेकिल्ले उध्वस्त होत असताना आजही थोपटेंचा मतदारसंघावर इतका होल्ड कसा आहे? तर याची बरीच कारण देता येऊ शकतील… सहकार चळवळ, शिक्षण संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांवरचं वर्चस्व आणि यासोबत मतदारसंघातील अनेक निकाली काढलेले प्रश्न हे सगळं थोपटेंच्या राजकारणाला प्लसमध्ये घेऊन जातं… मराठा समाजाचं असणारं वर्चस्व आणि वेल्हा – मुळशी भागातला आदिवासी भाग हा परंपरागत काँग्रेसलाच मतदान करत आलाय… साखर कारखानदारी, लोकसभेला आघाडीच्या बाजूने दिलेलं निर्णायक लीडही येणाऱ्या काळात थोपटेंना फायद्याचं ठरणार आहे… बाकी ऊसाची थकीत बिलं, गुंजवणीचा रखडलेला प्रस्ताव आणि शहरी पट्टयातील भागाकडे झालेलं दुर्लक्ष हे मात्र थोपटेंच्या अंगलट येऊ शकतं…
बारामती मतदारसंघातील इतर विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला आपला विस्तार करता आला असला तरी, भोर मतदारसंघांमध्ये भाजपला अद्याप आपलं अस्तित्व त्या प्रमाणात निर्माण करता आलेलं नाही. स्पष्ट भाषेत सांगायचं झालं तर थोपटेंच्या वर्चस्वामुळे ते त्यांनी करू दिलं नाही. शिवसेनेनं काही प्रमाणात या भागामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी मुळशीतील काही भाग आणि भोर तालुक्यातील हायवे लगतचा परिसर या भागातच फक्त शिवसेनेला आपला अस्तित्व निर्माण करता आलंय… बाकी मतदारसंघात अजूनही ‘सब कूछ थोपटे’ अशीच परिस्थिती आहे…
बाकी यंदा निवडणूक कशी होऊ शकते? याचा थोडा अंदाज लावला तर महाविकास आघाडीकडून संग्राम थोपटे यांचं नाव साहजिकच कन्फर्म आहे… तर थोपटेंचे पारंपारिक विरोधक कुलदीप कोंडे याही वेळेस शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे… अजित पवार गटाकडून माजी आमदार काशिनाथ खुटवत यांचे सुपुत्र विक्रम खुटवत आणि नगरसेवक किरण दगडे पाटील ही नाव सध्या थोपटेंच्या वर्चस्वला आव्हान देण्यासाठी तयार आहेत…लोकसभेला थोपटेंनी आघाडी धर्म पाळला… हेच पाहता शरद पवार गट थोपटेंचे प्रामाणिक काम करेल, यात तशी शंका नाही… पण मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद अशा सगळ्यांना हुलकावणी देत राजकारण शाबूत ठेवणाऱ्या थोपटेंना यंदा महायुतीकडून दणका मिळू शकतो का? संग्राम थोपटे यंदा आमदारकी वन साईड मारतील की फाईट घासून होईल? थोपटेंना पाणी पाजण्याची हिंमत भोरमध्ये कोण दाखवू शकतो? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.