अखेर हक्कभंगाच्या नोटिशीला राऊतांनी उत्तर दिलेच; म्हणाले की….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधिमंडळ हे चोरमंडळ आहे, असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केल्यांनतर त्यांच्याविरोधात राज्य सरकारने हक्कभंग नोटीस आणली होती. या नोटिशीला अखेर संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच मर्यादित आहे असं म्हणत याप्रकरणी सविस्तर खुलासा करण्यासाठी आणखी वेळ वाढवण्यात यावा अशी विनंती संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत यांनी याबाबत प्रधान सचिवांना पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटल, कोल्हापुरातील एका कार्यक्रमात विधान मंडळाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत काही सदस्यांनी आक्षेप घेतला व विशेषाधिकार भंग व अवमानाची सूचना मांडली. याबाबत खुलासा करण्यासाठी आपण मला 3 मार्च 2023 पर्यंत सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत मुदत दिली. मी आपणास नम्रपणे नमूद करू इच्छितो की, मी दि. 4 मार्चपर्यंत पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो व कर्नाटकच्या सीमेवरील भागात असल्याने मुंबईशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे दिलेल्या मुदतीत खुलासा करणे शक्य झाले नाही. तरी कृपया सविस्तर खुलासा करण्यासाठी आणखी मुदतवाढ मिळावी.

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र विधान मंडळाचा व सदस्यांचा मी नेहमीच आदर करतो. प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्य आहे.मी स्वतः अनेक वर्षे राज्यसभेचा सदस्य असल्याने मला अशा संसदीय मंडळांचे महत्त्व माहीत आहे. मी संपूर्ण विधान मंडळाबाबत कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नसून माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच मर्यादित आहे. हे कृपया लक्षात घ्यावे. तरीही या प्रकरणाबाबत सविस्तर खुलासा करण्याबाबत मुदतवाढ द्यावी अशी विनंती संजय राऊत यांनी केली.