मनसे नमोनिर्माण सेना पक्ष का झाला? संजय राऊतांचा राज ठाकरेंना खोचक सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईत पार पडला. या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच, त्यांच्या या भूमिकेबाबत प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. याबरोबर, मनसे पक्ष हा नमोनिर्माण सेना पक्ष कसा झाला? असा खोचक सवाल राऊतांनी राज ठाकरेंना विचारला आहे.

जनतेला काय उत्तर देणार?

राज ठाकरेंवर टीका करताना संजय राऊत यांनी म्हटले की, “राज ठाकरे काही काळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना महाराष्ट्राचे शत्रू आहेत असे सांगत होते. त्यांना महाराष्ट्रात ही पाऊल ठेऊ देऊ नका, असं आवाहन ते जनतेला करत होते. आता अचानक असा कोणता चमत्कार की साक्षात्कार झाला हे तुम्ही त्यांना जाऊन विचारलं पाहिजे. असं काय झालं की तुम्ही अचानक पलटी मारुन महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा देत आहात. जनतेला काय उत्तर देणार? यामागील कोणतं कारण आहे? कोणती फाईल तुम्हाला दाखवली की मुंबईत आल्यानंतर तुम्ही थेट त्यांना समर्थन जाहीर केले”

मनसे नमोनिर्माण पक्ष का झाला?

पुढे बोलताना, “तुमचा जो पक्ष आहे त्याचा नमोनिर्माण पक्ष का झाला? नमोनिर्माण पक्ष होण्याची अचानक का गरज पडली? हे राज ठाकरेंनी जनतेला सांगावं. त्यांच्या पक्षाने कोणती भूमिका घ्यावी हा त्यांचा निर्णय आहे. आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, अस्मितेसाठी लढत आहोत. समोर मोदी असतील किंवा अमित शाह असतील तरी आम्ही शरणागती पत्कारणार नाही.” असा टोला संजय राऊतांनी लगावला.

दरम्यान, गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना, “देशाच्या भवितव्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं, मला काही अपेक्षा नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांच्या महायुतीला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. माझं महाष्ट्रसैनिकांना एकच सांगायचं आहे, की विधानसभेच्या कामाला लागा” अशी घोषणा राज ठाकरेंनी केली आहे.