भाजपने श्रीरामाला किडनॅप केलं आहे, अयोध्येत राजकीय कार्यक्रम; राऊतांनी सुनावले खडेबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अयोध्यात येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचा (Ram Mandir) लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यासाठी देशातील अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना मात्र निमंत्रण नाही. यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर घणाघात केला आहे. अयोध्येतील मंदिराचं उद्घाटन हा भाजपचा (BJP) कार्यक्रम आहे, हा राजकीय कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही अयोध्येला जाणार आहोत. राम मंदिरात जाण्यासाठी आम्हाला भाजपच्या निमंत्रणाची गरज नाही असं संजय राऊत यांनी म्हंटल. ते मुंबई प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, या लोकांनी प्रभू श्रीरामाला किडनॅप केलं आहे. राममंदिराचं निमंत्रण हा एका पक्षाचा विषय झालाय. भाजपचा हा चुनावी का जुमला आहे. हा कार्यक्रम रामलल्लासाठी नाही, तो भाजपचा कार्यक्रम आहे. परंतु प्रभू रामाचे निमंत्रण देणारे हे कोण? देव स्वतः त्यांच्या भक्ताला बोलवत असतो आणि भक्त जात असतात. आमचं श्रीरामाशी वेगळं नातं आहे, त्यामुळे रामाच्या दर्शनासाठी आम्हाला भाजपच्या निमंत्रणाची गरज नाही असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं. तसेच एकदा हा भाजपचा हा राजकीय कार्यक्रम झाला कि मग आम्ही राम मंदिराच्या दर्शनासाठी जाऊ असेल संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले, भारताच्या नव्या संसदेचं उद्घाटन झालं. तेव्हा देखील हाच प्रकार झाला होता. हे जे सर्व चाललं आहे ते राजकीय आहे. देशाच्या स्वांतत्र्य लढ्यात ज्यांचे कवडीचेही योगदान नाही ते हिंदुस्थानच्या संसदेचे उद्धाटन करत आहेत आणि अयोध्येच्या संघर्षात ज्यांचे योगदान नाही तेच लोक आज राम मंदिराचे उदघाटन केलं जात आहे हे सगळं काही राजकारण आहे अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली.