राज ठाकरे भाजपचे नवे डार्लिंग, राणेंचा 2 लाख मतांनी पराभव…; राऊतांनी ‘रोखठोक’ च सांगितलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनातील रोखठोक सदरातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे (Raj thackeray) हे भाजपचे महाराष्ट्रातील नवे डार्लिंग बनले आहेत तर नारायण राणे (Narayan Rane) हे रत्नागिरी-सिंधुदुर्गात किमान 2 लाख मतांनी पराभूत होतील असे भाकीतही संजय राऊतांनी केलं आहे. संपूर्ण राज्यात मोदींविरुद्ध वातावरण आहे. महाराष्ट्र देशाला नेहमीच दिशा दाखवतो, ती दिशा या वेळी महाराष्ट्र दाखवेल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

स्वतःचा कंडू शमविण्यासाठी महाराष्ट्रावरील आकसापोटी मोदी-शहांनी शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची शकले केली, कुटुंबे फोडली. भाजपच्या राजकीय घसरणीस ताळतंत्र उरला नाही व आता शेजेवर कोणीही चालते अशी त्यांची स्थिती महाराष्ट्रात झाली, राज ठाकरे हे भाजपचे महाराष्ट्रातील नवे डार्लिंग बनले, पण उत्तर प्रदेश-बिहारात त्याचा फटका बसेल,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दक्षिण नगर मतदारसंघात नीलेश लंकेसारखा एक फाटका उमेदवार विखे-पाटलांचा पराभव करेल हे नक्की. नाशकात भुजबळांनी आधीच माघार घेतली. बारामतीत सुनेत्रा अजित पवारांचे काहीच चालणार नाही. कल्याण-डोंबिवली मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे पराभवाच्या छायेत आहेत. सातारा ‘राजां’ना सोपा नाही व कोल्हापुरात शाहू महाराजांची निवडणूक एकतर्फी होत आहे. विजयसिंह मोहिते पाटील व त्यांचे कुटुंब पुन्हा शरद पवारांच्या सोबत आले. त्यामुळे सोलापुरात प्रणिती शिंदे व ‘माढा’ मतदारसंघात राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते विजयी होतील.

अशोक चव्हाण, अजित पवार यांना सोबत घेतल्याने भाजपला महाराष्ट्रात फायदा होणार नाही. अजित पवार यांच्या गटास लोकसभेची एकही जागा मिळणार नाही. बारामतीत सुनेत्रा पवार व रायगडात सुनील तटकरे यांचा दारुण पराभव होत आहे. एकनाथ शिंदे यांचे राजकीय अस्तित्वही लोकसभा निवडणुकीनंतर राहील काय? हा प्रश्न आहे. शिंदे यांच्या वाट्याला 16 जागा आल्या. त्यांच्या पाच खासदारांना भाजपने उमेदवारी नाकारली. खरी शिवसेना म्हणणाऱ्यांची ही अवस्था! ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा ठोकला व शिंदे काहीच करू शकले नाहीत. उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत भाजपने हे करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे हे खंबीरपणे उभे राहिले. अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणत्याच स्वाभिमानाची अपेक्षा करता येणार नाही असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा साधला.