हिंदुत्त्व शिकवणारी आजची घराणी मोगलांची मांडलिक होती; राऊतांनी नावेच सांगितली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. राऊतांनी सामनातील रोखठोक सदरातून थेट भाष्य करत काही राजघराण्याची नावेच घेतली आहे, हि हिंदुत्त्व शिकवणारी आजची घराणी त्याकाळी मोगलांची मांडलिक होती असं संजय राऊत यांनी म्हंटल आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

भाजप वाशिंग मशीनमधून भ्रष्टाचाराचे डाग स्वच्छ करून मिळतात तसे हिंदुत्वाच्या बाबतीतही पडत आहे. अजित पवारांसारखे लोक एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले. शिंदेंचे चाळीस व पवारांबरोबरचे आमदार-खासदार हे उद्या संघ शाखांवर जाऊन कसरती करताना दिसतील व वैचारिक परिवर्तन घडत आहे असे जाहीर करतील. हिंदुत्वावर घाव घालणारे सर्व लोक भाजपात आले तसे ज्यांचे पूर्वज व घराणी मोगलांच्या चाकरीत धन्यता मानत होती त्यांचे आजचे वंशज भाजपच्या पखाली वाहताना दिसत आहेत. यापैकी अनेकांना भाजपने खासदार, आमदार म्हणून निवडून आणले. ‘लव्ह जिहाद’ हा लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचाराचा मुद्दा असेल, पण भाजपात आज असे अनेक लोक आहेत ज्यांच्या पूर्वजांनी मोगलांना आपल्या लेकीबाळी दिल्या. भारतीय जनता पक्षाने नुसता खिसा साफ केला तरी असे शंभरावर वाटगे मोगल पडतील.

जयपुर राजघराण्याचे लोक भाजपमध्ये आहेत. त्यांनीच एकदा ताज महालावर हक्क सांगितला होता. दिव्या कुमारीच्या घराण्याने सगळ्यात आधी राजस्थानमध्ये मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारले होते. बादशहा अकबराशी भारमल राजाने आपली मुलगी हरखाबाई हिचा विवाह करून दिला. त्यानंतर भारमलच्या मुलाने आपली मुलगी मानबाई हिचा विवाह शहजादा सलीमशी करून दिला. हलदी घाटात महाराणा प्रताप यांचा पराभव ज्याच्या नेतृत्वाखाली मोगलांनी केला तो मानसिंह हा त्याचा पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजावर चालून आलेला व शिवरायांचे सर्व किल्ले ‘तहात’ संधी साधून ताब्यात देणारा मिर्जा राजे जयसिंग याच पराण्यातला. या सगळयांनी परक्या मोगल साम्राज्यासाठी आयुष्य वेचले. औरंगजेबाने आग्यात शिवाजी महाराजाना नजरकैदेत ठेवले तेव्हा ज्या रामसिंहला महाराजांसोबत ठेवले होते तो रामसिंहदेखील याच घराण्यातला 1818 मध्ये इंग्रजांची मदत घेऊन मराठयाशी लढणारा जगतसिंहदेखील याच घराण्यातला. हे सर्व आधी मोगलाच व नंतर ब्रिटिशांचे मांडलिक झाले हा इतिहास असला तरी ही सर्व घराणी आज भाजपबरोबर आहेत व ते महाराष्ट्राला हिंदुत्व वगैरे शिकवत आहेत. पुन्हा ‘लव्ह जिहाद’ वगैरे विषय जोडीला आहेतच.

महुआ मोईत्रा या तृणमूल काँग्रेसच्या खासदार, संसदेत त्या जोरदार भाषण करतात त्यांचे भाषण ऐकून मोदींसह संपूर्ण भाजपचा रक्तदाब वाढतो. त्यांनी सांगितले, “2024 च्या निवडणुका जिंकण्यासाठी देशभरात दंगे घडवले जातील. अयोध्येत राममंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात देशभरातून विशेष ट्रेन सोडल्या जातील व त्यातील ट्रेनवर मुस्लिमांच्या गावांतून हल्ले घडवले जातील. त्याना पुन्हा ‘गोध्रा’ करायचे आहे.” महुआ मोईत्रा यांनी जे सांगितले ते गंभीरच आहे असं संजय राऊतांनी म्हंटल.