विरोधकांच्या प्रश्नांपासून पळ काढणारे पंतप्रधान; ‘रोखठोक’ मधून राऊतांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशभर गाजत असलेल्या अदानी प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. सामनातील रोखठोक सदरातून राऊतांनी अदानी प्रकरण आणि पीएम केअर फंड वरून मोदी सरकारवर घणाघात केलाय. आठ वर्षांत देश बराचसा विकला गेलाय अशी टीका संजय राऊतांनी केलीय. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संसदेतील भाषणाचे कौतुक केलं आहे.

गौतम अदानी यांच्या निमित्ताने निर्माण झालेले वादळ इतक्यात थांबेल असे वाटत नाही. अदानी यांच्या खिशात पंतप्रधान श्री. मोदी यांनी संपूर्ण देश घातला. मोदी यांनी अदानी यांना देश विकला, असे विरोधकांचे म्हणणे आहे. भाजप व अर्थमंत्री अदानी यांची वकिली करताना दिसतात हे आश्चर्य आहे असं संजय राऊतांनी म्हंटल.

मंगळवार, दि. 7-2-2023 रोजी राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण केले. ‘भारत जोडो’ यात्रेनंतर त्यांच्यात निर्माण झालेल्या प्रगल्भतेचे दर्शन या भाषणात झाले. ‘मोदी- अदानी’ युतीने देश कसा एककल्ली भांडवलशाहीकडे जात आहे हे श्री. गांधी यांनी मुद्देसूद मांडले व कोणत्याही प्रकारचा खोटेपणा त्यांच्या संपूर्ण भाषणात नव्हता. राहुल गांधी हे अदानी विषयावर सरकारची पिसे काढतील याची कल्पना असल्याने पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह एकही वरिष्ठ नेता व मंत्री सभागृहात उपस्थित नव्हता.

राहुल गांधी यांनी संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांना पंतप्रधान मोदी उत्तरे देतील असे वाटले होते, पण मोदी यांनी अदानी यांच्याबाबत अक्षरही काढले नाही. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याची हिंमत सरकारमध्ये नाही. सरकार म्हणजे दुसरे कोण ? तर एकमेव मोदी ! संपूर्ण देशाचा उद्योग व अर्थव्यवस्था अदानींच्या माध्यमांतून ताब्यात ठेवण्याचा विचार घृणास्पद आहे, राष्ट्रभक्ती या व्याख्ये न बसणारा आहे अशी आहे.

मोदी यांची सत्ता राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्वाच्या पायावर नाही, तर खोटेपणाच्या टेकूवर उभी आहे. याचे आणखी एक उदाहरण म्हणजे ‘पी. एम. केअर्स फंड.’ कोरोना काळात लोकांना मदत व्हावी या उदात्त हेतूने ही योजना पंतप्रधानांनी सुरू केली. पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता, सरकारी चिन्ह, सरकारी प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून हजारो कोटी रुपये या फंडात जमा केले गेले. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांतून पैसे कापून या पी. एम. केअर फंडात टाकण्यात आले. त्यासाठी इंटरनेटचे ‘gov.in’ हे सरकारी डोमेन मिळविले.

या केअर फंडाच्या ट्रस्टवर वरिष्ठ सरकारी अधिकारी नेमून उद्योगपती, व्यापारी, परदेशी संस्थांकडून अगणित पैसा बेहिशेबी पद्धतीने जमा केला. या संपूर्ण व्यवहाराचा हिशेब देण्यास व ऑडिट करण्यास प्रधानमंत्री कार्यालयाने नकार दिला. हे सर्व प्रकरण काही बेडर लोकांनी सर्वोच्च न्यायालयात नेले. तेव्हा मोदी सरकारने सांगितले, ‘पी. एम. केअर्स फंड सरकारी नाही व त्यावर सरकारचे कोणतेच नियंत्रण नाही!’ हा सर्वच प्रकार धक्कादायक आहे. स्वतः श्री. मोदी यांनी पंतप्रधानपदाचा अधिकृत वापर करून हा ‘फंड’ असल्याचे भासवून निधी गोळा केला व त्याचा हिशेब दिला नाही हा आर्थिक अपराध नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

अदानी प्रकरणाची चौकशी होणार नाही व पी. एम. केअर्स फंडातील ‘मनी लाँडरिंग’ तपासण्याची हिंमत ईडी व सीबीआयमध्ये नाही. राहुल गांधी यांनी लोकसभेत ‘मोदी-अदानी’ युतीवर व सरकारच्या खोटेपणावर सर्जिकल स्ट्राइक केला. राहुल गांधींचे भाषण संपल्यावर अनेक भाजप खासदारांचे चेहरे समाधानी होते. त्यांच्या मनात आनंद उसळत होता, पण चेहऱ्यावर दाखवता येत नव्हता. 2024 साठी हे आशादायी चित्र आहे. भारत कोणाच्या खिशात जात आहे ते राहुल गांधी यांनी बेडरपणे संसदेत सांगून टाकले. मोदींनी त्यावर उत्तर देण्याचे टाळले. मोदी 2014 पूर्वी गांधी परिवारास उद्देशून म्हणाले होते, “मैं देश नहीं मिटने दूंगा.” आज तेच गांधी मोदींकडे पाहून बोलत आहेत, “मैं देश नहीं बिकने दूंगा!” पण आठ वर्षांत देश बराचसा विकला गेलाय ! अशा शब्दात संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.