अशोक चव्हाणसुद्धा काँग्रेसवर दावा करून…; राऊतांचे ट्विट चर्चेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांच्यासमवेत काँग्रेसमधील जवळपास १० ते १२ आमदार असल्याची चर्चा सुरु आहे. या सर्व घडामोडींमुळे राजकीय खळबळ उडाली असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या एका ट्विटने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? असा खोचक सवाल संजय राऊतांनी (Sanjay Raut) आपल्या पोस्ट मधून केला आहे.

अशोक चव्हाण भाजपवासी झाले.विश्वास बसत नाही. काल पर्यंत ते सोबत होते.. चर्चा करीत होते..आज गेले. एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? आपल्या देशात काहीही घडू शकते! असं ट्विट संजय राऊतांनी केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून ४० आमदारांना सोबत घेऊन बंड केल्यानंतर आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता. निवडणूक आयोगने त्यांच्या गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिले सुद्धा… हीच गोष्ट अजित पवार यांच्यासोबत सुद्धा सुद्धा घडली. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून ४० आमदारांसह सरकारमध्ये प्रवेश केला, त्यांनाही निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दिले. हाच धागा पकडून संजय राऊतांनी हे ट्विट केलं आहे.

दरम्यान, मागील महिन्यात दिग्गज नेते मिलिंद देवरा यांनी शिंदेंच्या शिवसेनेत आणि त्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता अशोक चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्याने काँग्रेसला रामराम ठोकल्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत विश्वजीत कदम, जितेश अंतापूरकर, अस्लम शेख, अमीन पटेल, हिरामण खोसकर, सुलभा खोडक, माधव जवळकर, अमित झनक हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंपच म्हणावा लागेल.