ED च्या कारवाईनंतर संजय राऊतांचं विरोधी पक्षनेत्यांना पत्र; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांना 8 ऑगस्ट पर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीतर्फे त्यांची चौकशी सुरु आहे. या दरम्यान राऊतांनी अटकेनंतर केंद्रातील विरोधी पक्षनेत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबाबत राज्यसभेच्या विरोधी पक्ष नेत्यांना एक पत्र पाठवले आहे. ते सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले असून “बाळासाहेबांची शिकवण आहे. शिवसैनिकांनी रडायचं नाही. सत्यासाठी लढायचं, त्यामुळे धीर सोडू नका. विजय आपलाच होणार आहे,” असे पत्रात राऊतांनी म्हंटले आहे.

काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांना पत्र पाठवत राऊतांनी ईडीच्या कारवाईबाबत आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी पत्रात म्हंटले आहे की, “संकट काळातच आपल्यासोबत कोण आहेत आणि शुभचिंतक कोण आहे, हे कळतं. सध्या माझ्याविरोधात सुरु असलेल्या राजकीय सूड नाट्यात तुम्ही दिलेल्या पाठिंब्यामुळे मी आभारी आहे. केंद्र सरकारतर्फे केंद्रिय तपास यंत्रणांद्वारे हेतु पुरस्सर चौकशी सुरु आहे. सत्यासाठी माझा लढा सुरुच राहिल. कितीही दबाव आला तरी लढा सुरु ठेवेन. मी दबावाला बळी पडणार नाही.

Sanjay Rauta's Letter

यावेळी राऊतांनी पत्रातून बाळासाहेब ठाकरे यांच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे. वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, रडायचं नाही, लढायचं.. सत्यासाठी लढायचं… या लढ्यात माझ्या पाठिशी शब्दांचं बळ देण्यात तसेच कृती आणि विचारसरणीतून पाठिशी राहण्यात तुम्ही साथ दिली. त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे, असे राऊत यांनी खरगे यांना म्हंटल आहे. तसेच संसदेत आणि संसदेबाहेर माझ्या पक्षाने मांडलेल्या भूमिकेशी तुम्ही सहमत राहिलात. काळ आणि संयम ही दोन प्रमुख शस्त्र असतात. हाच विचार आणि बाळासाहेब ठाकरेंची शिकवण तसेच उद्धव ठाकरे, माझे कुटुंबीय, हितचिंतकांच्या साथीने या लढाईत मी जिंकेन असा विश्वास आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा, असे राऊतांनी शेवटी पत्रात म्हंटले आहे.

राऊतांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी –

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधातल्या कारवाई करण्यात अली असून त्यांना 8 ऑगस्ट पर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या ईडीतर्फे त्यांची चौकशी सुरु आहे. त्यांची पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीचे समन्स आले आहे.