एकनाथ शिंदेंसह अजित पवार कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार? नव्या दाव्याने चर्चांना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या नवीन पक्षासाठी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले आहे. आज याच चिन्हाचे रायगडावर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. आता हेच चिन्ह घेऊन जोमाने शरद पवार यांचा गट निवडणुकीसाठी सज्ज होणार आहे. मात्र या सगळ्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक मोठा दावा केला आहे. भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला आणि अजित पवार यांच्या गटाला कमळ या चिन्हावरच निवडणूक लढवण्याची ऑफर्स दिली होती, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

संजय राऊत यांचे वक्तव्यं

आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “भाजपाने अजित पवार गट आणि शिंदे गटापुढे प्रस्ताव ठेवलेला आहे की तुमचे उमेदवार कमळ चिन्हावर लढतील. शिंदे गटाला धनुष्यबाण मिळाले असले तरी लोक तुम्हाला मतदान करणार नाहीत. तसेच, अजित पवार गटाकडे घड्याळ असलं तरी त्यांना कोणी मतदान करणार नाही, त्यामुळेच तुम्ही कमळावरच लढा असा प्रस्ताव जे. पी. नड्डांनी दिला आहे”

त्याचबरोबर, “ज्या गटांनी चिन्हे चोरली त्यांच्यात त्या चिन्हांवर निवडणूक लढण्याची हिंमत नाही. भाजपात गेलेल्या 2 गटांना त्यांच्या निवडणूक चिन्हावर निवडवणूक लढवण्याचे धाडस नाही. महाराष्ट्रात खरी शिवसेना ही मशाल चिन्हावर लढेल. तसेच खरी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवारांचा पक्ष तुतारी घेऊन लढेल. काँग्रेस पक्षाचा हात सोबत आहेच. त्यामुळे भविष्यातील निवडणूक रोमांचकारी होईल” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

इतकेच नव्हे तर, “‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ गटाला खूप चांगलं चिन्ह मिळालं आहे. या चिन्हाला ऐतिहासिक महत्व आहे. शिवसेनेला मशाल मिळाल्यामुळे आधीच उत्साहाचे वातावरण होत. त्यात आता महाराष्ट्रातील 11 कोटी जनता यापुढे हातात मशाल घेऊन तुतारीच वाजवणार आहे” असा देखील विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.