हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या शिंदे गटात काही आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असताना शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज एक मोठा दावा केला. शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट हे नाराज असून ते लवकरचं ठाकरे गटात येतील, असे अंधारे यांनी आज म्हटले. त्याच्या दाव्यावर शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले असून आमची ताई सुषमा अंधारे मला भावाप्रमाणे समजते. त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. कुणीतरी माझी काळजी करणारा आहे. पण, अशी कोणतीही नाराजी माझ्याकडं नाही. मी नाराज नाही. माझ्या नाराजीला काही कारण नाही, असे शिरसाट यांनी म्हंटले.
सुषमा अंधारे यांनी केलेल्या दाव्यानंतर शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मंत्रिपद न मिळाल्याने मी नाराज असल्याची खोटी माहिती दिली जात आहे. मंत्रिपदाचा निर्णय हा मुख्यमंत्री घेत असतात. शिंदे गटात मी नाराज नाही. सुषमा अंधारे यांनी दावा केला त्यात कोणतही तत्थ्य नाही. मी शिंदे गटात नाराज होण्याचं काही कारण नाही.
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी जळगाव येथे महाप्रबोधन यात्रेदरम्यान संजय शिरसाट हे शिंदे गटात नाराज असल्याचे म्हटले होते. ते ठाकरे गटात परत येणारे पहिला आमदार राहू शकतात, असे मला वाटत असल्याचेही त्या म्हणाल्या. त्यावर संजय शिरसाट यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.